– लोकसत्ता प्रतिनिधी

राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे एनएसईची स्थापना तशी अलीकडलीच म्हणजे १९९२ ची. म्हणजे भारतीय बाजारात नवीनच असणारे हे अपत्य. जसे धाकटे अपत्य थोडेसे जास्त हुशार असते, असे म्हणतात. त्याप्रमाणेच जन्मापासूनच याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती. आधुनिकता हा महत्त्वाचा घटक आहे. ऑन स्क्रीन ट्रेडिंग सुरू करण्याचे खरे श्रेय राष्ट्रीय शेअर बाजाराला आणि नवीन आर्थिक उत्पादने आणण्याचे श्रेयदेखील एनएसईलाच जाते. वायदा बाजार म्हणजे डेरिव्हेटिव्ह मार्केटला जर मोठ्या प्रमाणावर लोकांची पसंती असेल तर ती एनएसईमुळे. बाजारभांडवलाची तुलना केली तर एनएसईचे बाजारभांडवल भारतात दुसऱ्या बाजारमंचाच्या तुलनेत अधिक आहे. एनएसईने नेहमीच आधुनिकतेची जोड आपल्या व्यवहाराला दिली. पहिल्या दिवसापासून आजतागायत कधीही एनएसईने कागदी समभाग दिले नाहीत, तर इलेक्ट्रॉनिक रूपातच ते वितरित केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नावात राष्ट्रीय असले तरीही सरकारची थेट मालकी एनएसईमध्ये नाहीच. पण काही कंपन्यांच्या माध्यमातून अप्रत्यक्षरीत्या मालकी नक्की आहे. तुलनेने नवीन असणाऱ्या या बाजारात सुमारे २,००० कंपन्यांचे समभाग सूचिबद्ध आहेत. अर्थातच याचे मुख्यालयदेखील मुंबईमध्ये असून जगभरात टर्मिनल्स आहेत. एनएसईची स्थापनाच मुळातच मुंबई स्टॉक एक्सचेंजची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी करण्यात आली. यालादेखील एकप्रकारे हर्षद मेहता प्रकरण कारणीभूत होते. जुन्या बाजाराला आधुनिकतेची जोड देणे अतिशय कठीण होत होते, म्हणून सरकारने एक समिती स्थापन केली जिचे नाव होते फेरवानी समिती आणि या समितीच्या शिफारशीनुसार एनएसईची स्थापना झाली. दुर्दैवाने मनोहर फेरवानी एनएसईची प्रगती बघू शकले नाहीत. हर्षद मेहता-कृत घोटाळ्यावरील अलीकडेच निर्मिती वेब मालिकेत त्याबाबत माहिती आपल्याला मिळू शकते. सुरुवातीला फक्त कर्जरोखे आणि मध्यम व छोट्या कंपन्यांमध्ये व्यवहार करणाऱ्या एनएसईने हळूहळू आपले पंख पसरवले. वायदे बाजार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम एनएसईने केले. आजदेखील भारतात वायदे बाजारातील सर्वाधिक व्यवहार एनएसईच्या माध्यमातून पार पडतात. एनएसईचे चार महत्त्वाचे निर्देशांक आहेत. ज्यात निफ्टी ५०, निफ्टी बँक, निफ्टी वित्तीय सेवा आणि निफ्टी मध्यम उद्योग यांचा त्यात समावेश होतो. निफ्टी ५० हा एनएसईचा निर्देशांक भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारे व्यापक स्वरूप दर्शवतो.

हेही वाचा – बाजारातली माणसं : नातवाला सांगितलेली आजोबांची गोष्ट

कितीही नवीन असला तरीही एनएसईदेखील काही घोटाळ्यांपासून मुक्त नाही. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या स्थापनेपासून त्याच्याशी निगडित असणाऱ्या चित्रा रामकृष्ण आणि माजी व्यवस्थापकीय संचालक रवी नारायण यांच्यावर एनएसईच्या आवारातच काही मर्जीतील शेअर दलालांना परवानगी देऊन त्यांच्या प्रणालीमध्ये शिरून व्यवहार काही मायक्रो सेकंद आधी जाणून घेण्यास मदत केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्या दलालांनी कित्येक कोटींचा फायदा कमावला आणि सेबीने चित्रा रामकृष्णन यांना ५ कोटी रुपयांचा दंडदेखील ठोठावला. त्यांच्या या कृत्यामागे एका हिमालयातील योगीचादेखील समावेश होता असे म्हटले जाते. असो, तरीहीदेखील वित्त क्षेत्रामध्ये एनएसईचे योगदान अमूल्य आहे.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National stock exchange nse trusted market platform print eco news ssb