लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: भांडवली बाजरात तेजीवाल्यांनी गुरुवारी सलग पाचव्या सत्रात विक्रमी दौड राखत नवीन उच्चांकी पातळी गाठली. निर्देशांकातील सर्वाधिक वजनदार कंपन्या असलेल्या एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने सेन्सेक्सने ८२ हजारांची तर निफ्टीने २५ हजार अंशांची विक्रमी पातळी ओलांडली.
गुरुवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १२६.२१ अंशांनी वधारून ८१,८६७.५५ या नव्या उच्चांकावर स्थिरावला. सत्रात त्याने ३८८.१५ अंशांची मजल मारत ८२,१२९.४९ ही ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ५९.७५ भर पडली आणि तो २५,०१०.९० या सर्वोच्च शिखरावर बंद झाला. त्याने प्रथमच विक्रमी २५,००० अंशांची पातळी ओलांडली आहे.
आणखी वाचा-ओला इलेक्ट्रिक ‘आयपीओ’द्वारे ६,१०० कोटी उभारणार! गुंतवणूकदारांना ७२ ते ७६ रुपये किमतीला समभाग खुले
अमेरिकेत महागाईचा दबाव कमी झाल्यामुळे सप्टेंबरच्या बैठकीत व्याजदर कपातीचा विचार केला जाऊ शकतो, असे संकेत फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांनी बुधवारी दिल्यांनतर त्याचे देशांतर्गत भांडवली बाजारावर सकारात्मक पडसाद उमटले. मात्र, इस्रायल आणि हमासमधील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे खनिज तेलाच्या किमती वाढल्यामुळे बाजारातील तेजीला मर्यादा पडली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
आणखी वाचा-बाजार-रंग : अर्थसंकल्पातील आकडेमोड जुळवताना
सेन्सेक्समध्ये पॉवर ग्रिड, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, नेस्ले इंडिया, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, मारुती सुझुकी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर महिंद्र अँड महिंद्र, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक, लार्सन अँड टुब्रो आणि टाटा मोटर्सच्या समभागात मात्र घसरण झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार बुधवारच्या सत्रात भांडवली बाजारात निव्वळ विक्रेते राहिले. त्यांनी ३,४६२.३६ कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले.
सेन्सेक्स ८१,८६७.५५ १२६.२१ (०.१५%)
निफ्टी २५,०१०.९० ५९.७५ (०.२४%)
डॉलर ८३.७३ ५
तेल ८१.६३ ०.९८