Nifty crosses 25000 mark अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांच्या अनुकूल विधानाने बळावलेल्या व्याजदर कपातीच्या आशेचे प्रतिबिंब सोमवारी स्थानिक भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांकांच्या एका टक्क्यांहून मोठ्या उसळीतून उमटले. याच कारणाने सलग आठव्या सत्रात तेजीची मालिका सुरू ठेवताना, निफ्टी निर्देशांकाने २५,००० अंशांपुढे मजल मारली, तर सेन्सेक्सने सहा शतकी वाढ साधली.
सोमवारच्या सत्रातील तेजीसह, प्रमुख निर्देशांक हे आता १ ऑगस्ट रोजी स्थापित केलेल्या सार्वकालिक उच्च पातळीपासून जेमतेम अर्धा टक्क्यांच्या अंतरावर आहेत. निफ्टीने त्या दिवशी २५,०७८ अंशांची विक्रमी उच्चांक स्थापित केला होता, तो आता केवळ ६८ अंशांनी दूर आहे. निफ्टीसाठी जुलैनंतर एका सत्रात सर्वाधिक कमाईचे सोमवारचे सत्र ठरले.
हेही वाचा >>> व्यापाऱ्यांचा राज्यस्तरीय बंद स्थगित
एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या वजनदार समभागांमधील भाव-तेजीसह, प्रामुख्याने माहिती-तंत्रज्ञान समभागांनी निर्देशांकांना उच्चांकी झेप घेण्यास विशेष हातभार लावला. सेन्सेक्समधील एचसीएल टेक, टेक महिंद्र, टीसीएस हे आघाडीचे माहिती-तंत्रज्ञान समभाग सोमवारच्या तेजीचे सर्वात मोठे लाभार्थी ठरले. मुख्यत्वे या कंपन्या त्यांच्या कमाईचा लक्षणीय भाग हा अमेरिकेमधून कमावतात आणि अमेरिकेतील अर्थस्थितीबाबत ताजे सकारात्मक संकेत पाहता, त्यांना स्थानिक बाजारात मागणी वाढली आहे. सोमवारच्या सत्रात आयटी निर्देशांक, तब्बल १.३९ टक्क्यांनी वाढला. १३ प्रमुख क्षेत्रांपैकी १२ क्षेत्रीय निर्देशांकांनी वाढ साधली. धातू निर्देशांक सर्वाधिक २.१६ टक्क्यांनी उसळला. निफ्टीतील ५० पैकी ३३ समभाग मूल्यवाढीसह स्थिरावले.
बाजारातील तेजीवाल्यांची पकड घट्ट बनल्याचा प्रत्यय म्हणजे देशांतर्गत व्यवसायावर केंद्रित स्मॉल आणि मिड-कॅप निर्देशांकांतही सोमवारी अनुक्रमे ०.३ टक्के आणि ०.६ टक्के अशी वाढ झाली.
हेही वाचा >>> Gold-Silver Price: सणासुदीच्या दिवसांत घसरणीनंतर सोन्याच्या किमतीत वाढ, जाणून घ्या १० ग्रॅमची किंमत
विदेशी गुंतवणूकदारही सक्रिय
अमेरिकेतील नरमलेल्या चलनवाढीची आकडेवारी, कमी झालेले बेरोजगारीचे दावे वाचन, फेडच्या अलीकडच्या बैठकीतील इतिवृत्तान्ताचा सकारात्मक कल आणि गेल्या सप्ताहाअखेरीस फेडचे प्रमुख जेरोम पॉवेल यांच्या ‘व्याजदर कपातीची वेळ आली आहे’ या ठोस आश्वासक टिप्पणीमुळे जागतिक बाजारात तेजीचे वारे पसरण्यास मदत झाली आहे. अमेरिकी डॉलरचे घसरलेले मूल्यही बाजारातील सकारात्मक भावनांसाठी पूरक ठरले. गेल्या काही सत्रात विक्रेत्याच्या भूमिकेत असलेल्या विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सक्रियपणे खरेदी सुरू केली आहे. शुक्रवारच्या सत्रातही त्यांनी १,९४४.४८ कोटी मूल्यांची नक्त खरेदी केली होती. सप्टेंबरमधील संभाव्य फेड कपातीतून या गुंतवणुकीला आणखी चालना मिळेल, असे विश्लेषकांचे कयास आहेत.