Nithin Kamath: झेरोधाचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामथ सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते सतत शेअर बाजार आणि गुंतवणुकीबाबत सोशल मीडियावर लिहित असतात. अशात आता कामथ यांना आता एक्सवर एक नवी पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी, गुंतवणूकदारांचे नुकसान होण्यास कारणीभूत असणाऱ्या दोन चुका सांगितल्या आहेत. आधी अनावश्यक खर्च करणे, नंतर तो खर्च भागवण्यासाठी कर्ज घेणे आणि आरोग्य विमा नसने या दोन चुका असल्याचे कामथ यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी शेअर बाजारातील शॉर्टकटची कल्पना फेटाळून लावली आहे. ते म्हणतात की खरी संपत्ती सातत्यपूर्ण चांगल्या सवयी आणि संयमाने हळूहळू निर्माण होते.

पण दुर्दैवाने, श्रीमंत होण्यासाठी…

निथीन कामथ यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले की, “मला अनेकदा स्टॉकबाबत लोकांना श्रीमंत बनवणाऱ्या टिप्स मागितल्या जाताता. पण दुर्दैवाने, श्रीमंत होण्यासाठी कोणतेही शॉर्टकट नाहीत. श्रीमंत होण्यासाठी चांगल्या सवयी आणि संयम लागतो. तुम्हाला आवश्यक नसलेल्या वस्तू खरेदी करणे किंवा त्याहूनही वाईट म्हणजे त्या खरेदी करण्यासाठी कर्ज घेणे. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे आरोग्य विमा नसणे. अशा गोष्टी खरोखरच तुमचे नुकसान करू शकतात.”

जास्त कमाई म्हणजे…

नितीन कामथ यांनी या पोस्टबरोबर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये असा मेसेज आहे की, जास्त कमाई म्हणजे जास्त बचत करणे नाही. खरं तर गॅझेट्स, कपडे, फॅन्सी जेवण किंवा फक्त दिखाव्यासाठी असलेल्या गोष्टींवर यामुळे अनेकदा जास्त खर्च होतो. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे? त्यातील बराचसा भाग ईएमआय साठी जातो. म्हणजे तुम्ही पगार होण्यापूर्वीच पैसे खर्च केलेले असतात.

तुम्ही शेवटी बँकेसाठी…

कामथ यांच्या या व्हिडिओमधून मध्यमवर्गीयांच्या तथाकथित यशाच्या मार्गाला आव्हान देण्यात आले आहे. “नोकरी मिळवा, कर्ज घ्या, घर खरेदी करा आणि यशस्वी असल्याचे दाखवा. पण हे स्वातंत्र्य नाही; हे कर्जाचे सापळे आहेत. तुम्ही शेवटी बँकेसाठी काम करत असता. गाडी, फोन, अगदी घरही, हे सर्व दुसऱ्याचे आहे”, असेही कामथ यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

आयुष्य क्षणार्धात रुळावरून घसरू शकते

“बहुतेक लोक कमी कमावतात म्हणून गरीब नसतात. आरोग्य आणीबाणी किंवा नोकरी जाण्यासारख्या अचानक घडलेल्या घटनेमुळे ते कंगाल होतात. फक्त एक वाईट महिना त्यांना पाच वर्षे मागे ढकलू शकतो. शिवाय, भारतातील महागड्या वैद्यकीय खर्चामुळे तुमचे आयुष्य क्षणार्धात रुळावरून घसरू शकते”, असे व्हिडिओच्या शेवटी म्हटले आहे.