Nithin Kamath: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील विवध देशांवर अतिरिक्त व्यापार कर लादण्याची घोषणा केल्यानंतर जगभरातील शेअर बाजारातील अस्थिरता वाढली आहे. अशा परिस्थिती गुंतवणूकदारांनी काय करावे याबाबत झेरोधाचे सीईओ आणि सह-संस्थापक नितीन कामथ एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी, गुंतवणूकदारांनी पुढील काही दिवस शेअर बाजारातून ब्रेक घ्यावा, असे म्हटले आहे.
दरम्यान काल आरबीआयने रेपो दरात कपात करून आपला दृष्टिकोन बदलला तरीही बुधवारी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक पुन्हा घसरल्याचे पाहायला मिळाले होते. अलिकडेच, भारतीय शेअर बाजारांमध्ये घसरण झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर असलेले निर्देशांक १५ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. या महिन्यांत, किरकोळ गुंतवणूकदारांनी गेल्या वर्षभरात कमावलेले पैसे मोठ्या प्रमाणात गमावले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आता थोडी विश्रांती घ्यावी, असे कामथ यांनी म्हटले आहे.
पुढील दहा दिवसांत…
एक्सवरील पोस्टमध्ये नितीन कामथ यांनी म्हटले की, “या सल्ल्याचे पालन करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. पुढील १० दिवसांत, फक्त ४ ट्रेडिंग दिवस आहेत. ट्रेडिंगमधून ब्रेक घेऊन रिचार्ज होणे ही वाईट कल्पना नाही. जे काही घडत आहे ते पाहता, तुम्हाला याची आवश्यकता असेल.”
ते पुढे म्हणाले की, “नफा मिळवण्यासाठी तुम्हाला बाजारातील मूड आणि तुमच्या मानसिक स्थितीवर लक्ष ठेवणे आवश्यक असते. जेव्हा दोन्हीपैकी एकही गोष्ट अनुकूल नसेल, तेव्हा थांबून परिस्थिती बदलण्याची वाट पाहणे चांगले. या संभाव्य कमकुवत परिस्थितीतही तुम्ही ट्रेडिंग करावे असा विचार करण्याची चूक करू नका.”
किरकोळ गुंतवणूकदार निव्वळ खरेदीदार
दरम्यान दोन दिवसांपूर्वीही नितीन कामथ यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांनी गेल्या ५ वर्षातील शेअर बाजारातील डेटा शेअर केला होता. त्यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केले की, गेल्या काही वर्षांत किरकोळ गुंतवणूकदार कसे निव्वळ खरेदीदार राहिले आहेत हे निदर्शनास आणून दिले.
“गेल्या पाच वर्षांत सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे किरकोळ गुंतवणूकदार सातत्याने शेअर्सचे निव्वळ खरेदीदार राहिले आहेत. घसरणीनंतरही ते खरेदी करत राहतील की नाही याचा अंदाज कोणीही घेऊ शकतो,” असे कामथ यांनी सोशल मीडियावर लिहिले. जानेवारी २०२० पासून आतापर्यंत किरकोळ गुंतवणूकदार कसे खरेदी करत आहेत हे दर्शविणारा ग्राफही त्यांनी शेअर केला.