Nithin Kamath On Zerodha Zero Brokerage: अनेक किरकोळ गुंतवणूकदारांना, जरी प्रत्येक ट्रेडवर लागणारे ब्रोकरेज शुल्क क्षुल्लक वाटत असली तरी, कालांतराने त्याचा परताव्यावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळते. अशात आता झिरोधाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामथ यांनी ब्रोकरेज शुल्काच्या दीर्घकालीन परिणामांवर प्रकाश टाकत ट्रेडिंग शुल्काभोवतीची चर्चा पुन्हा सुरू केली आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये, कामथ यांनी दशकापूर्वी इक्विटी डिलिव्हरी ट्रेडवरील ब्रोकरेज शुल्क माफ करण्याच्या झिरोधाच्या निर्णयावर प्रकाश टाकत दावा केला की, या निर्णयामुळे गेल्या काही वर्षांत किरकोळ गुंतवणूकदारांच्या सुमारे २ हजार कोटी ते २० हजार कोटींची बचत झाली आहे.
सध्या, झिरोधावर इक्विटी डिलिव्हरीवर कोणतेही ब्रोकरेज शुल्क नाही. पण, पूर्वी यासाठीही शुल्क आकारले जात होते. त्यानंतर डिसेंबर २०१५ मध्ये झिरोधाने इक्विटी डिलिव्हरीवरील ब्रोकरेज शुल्क शून्य केले होते. त्यापूर्वी कंपनी त्यावर ०.१ टक्के किंवा २० रुपये आकारत असे.
हे शुल्क शून्य केले नसते तर…
नितीन कामत यांनी एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, ही शुल्कमाफी दीर्घकाळासाठी असेल की अल्पकाळासाठी, याबद्दल अनेकांना शंका होती. इतकेच नव्हे तर नितीन यांच्या मते, त्यांना स्वतःलाही ही शंका होती. पण दहा वर्षे उलटूनही कंपनीने हे धोरण कायम ठेवले आहे.
नितीन कामत यांच्या मते, जर कंपनीने हे शुल्क शून्य केले नसते आणि कॅपशिवाय बाजार दराच्या ०.१% (किंवा २० रुपये) किंवा ०.१ किंवा ०.३% आकारले असते, तर गुंतवणूकदारांना २००० कोटी ते २०,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले असते.
गुतंवणूकदारांची सर्वात मोठी चूक म्हणजे…
नितीन कामत म्हणतात की, गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सची सर्वात मोठी चूक म्हणजे शुल्काकडे दुर्लक्ष करणे. कारण हे दुर्लक्ष केल्याने याचा त्यांचा एकूण परताव्यावर परिणाम होतो. ते म्हणाले की काही लोकांना ०.५ टक्के ब्रोकरेज खूप कमी वाटते आणि म्हणून ते त्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु बहुतेक लोक त्यांचे ट्रेडिंग शुल्कही वसूल करू शकत नाहीत. नितीन कामत म्हणाले की, जर तुम्ही महिन्यातून फक्त काही ट्रेड केले तरी खर्च लवकर वाढतो. अशा परिस्थितीत, शुल्कांची जाणीव असणे आवश्यक आहे.