लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वित्त व्यवस्थापन सेवा क्षेत्रातील कंपनी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या संचालक मंडळाने शुक्रवारी एकास तीन बक्षीस (३:१) देण्याची शिफारस केली आहे. बक्षीस समभागासाठी भागधारकांची पात्रता ठरविणारी ‘रेकॉर्ड तारीख’ कंपनीकडून अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.

मोतीलाल ओसवालने मार्चअखेर सरलेल्या तिमाहीत ७२४.६ कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे. वार्षिक तुलनेत कंपनीच्या नफ्यात चारपटीने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत १६७ कोटी रुपयांचा करोत्तर नफा तिने मिळवला होता, असे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीचे उत्पन्न २,१५८.१५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. जे आधीच्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १,०३३.५४ कोटी होते. तर २०२३-२४ या संपूर्ण आर्थिक वर्षात, कंपनीने २,४४५.६२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा आणि ७,१३०.५२ कोटी रुपये एकूण उत्पन्न मिळवले आहे. सकारात्मक निकाल आणि बक्षीस समभागाच्या पार्श्वभूमीवर, कंपनीचा समभाग ८.६६ टक्क्यांनी वधारून मुंबई शेअर बाजारात २,६७७ रुपये या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. दिवसअखेरीस समभाग ५.६७ टक्क्यांनी वाढून २,६००.६५ रुपयांवर स्थिरावला.