पेशवेकालीन प्रसंगातील वाक्य…राघोबादादा हे माधवराव पेशव्यांविरुद्ध बंडाळीच्या पवित्र्यात असल्याची कुणकुण पेशव्यांना लागते, तेव्हा राघोबादादांना नजरकैदेत ठेवले जाते. काही कालावधीनंतर राघोबादादा पेशव्यांकडे तक्रार करतात की, मला एकटे राहून कंटाळा आला आहे तरी माझे मित्र सखाराम बोकील यांना भेटण्याची परवानगी द्यावी. या भेटीमागील अंतस्थ हेतू पेशवे जाणून होते. या भेटीत आपल्याविरुद्ध जी काही कटकारस्थाने शिजतील ती आपल्याला वेळीच समजून त्यावर उपाययोजना करता येईल या हेतूने माधवराव पेशव्यांनी या भेटीला परवानगी दिली. या दोघांच्या भेटीत जे काही संभाषण होईल त्यावर नजर ठेवण्यासाठी आपल्या विश्वासू सहकाऱ्याची नेमणूक ते करतात. या दोघांच्या भेटीदरम्यानचा वृत्तांत सांगताना सहकारी सांगतो की, राघोबादादा व सखाराम बोकील विरंगुळ्यासाठी बुद्धीबळाचा डाव मांडतात, पण या संपूर्ण भेटीत दोघेही एकमेकांशी चकार शब्दही बोलत नाहीत. यावर माधवराव बोलतात हे शक्यच नाही. पुन्हा नीट आठवून बघ एखादा शब्द तरी बोलले असतील. त्यावर तो सहकारी म्हणतो की, बुद्धिबळाच्या चालीसंदर्भात सखाराम बोकील हे राघोबादादांना म्हणाले की…‘दादा घोडा एक घर मागे घ्या’ हे डाव मांडलेला असतानाच फक्त एकच वाक्य बोलले. माधवराव म्हणतात, या भेटीमागचा अंतस्थ हेतू समजला. त्या सहकाऱ्याला माधवराव सांगतात, बुद्धिबळात घोड्याची चाल अडीच घरांची आता घोडा एक घर मागे घ्या, याचा अर्थ सखाराम बोकील दादांना सुचवतात की, तुम्हाला जो उठाव करायचा आहे त्यासाठी येणारे अडीच महिने प्रतिकूल आहेत. तेव्हा अडीच महिने शांत राहा. याचा अर्थ निदान येणारे अडीच महिने तरी राघोबादादा पेशाव्यांविरुद्ध उठाव करणार नाहीत. पेशवे म्हणतात की, आता अडीच महिन्यांची तरी निश्चिंती आहे. हे सर्व आता आठवण्यामागचे कारण निफ्टीने १९,७५० पातळीचा भरभक्कम आधार तोडल्याने आता तेजी लुप्त झाली आहे. निफ्टी निर्देशांक किती घर खाली येणार हाच काय तो प्रश्न? या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळूया.
शुक्रवारचा बंद भाव:
सेन्सेक्स : ६५,३९७.६२
निफ्टी : १९,५४२.६५
गेल्या लेखात आता चालू असलेल्या घसरणीबाबत सूतोवाच केले होते… निफ्टी निर्देशांकावर १९,७५० ते १९,९५० या २०० अंशांच्या परिघाला (बॅण्डला) भविष्यात ‘अनन्यसाधारण महत्त्व’ असून यावर भविष्यकालीन तेजी-मंदीचे आडाखे अवलंबून आहेत. निफ्टी निर्देशांकाने १९,९५० ची पातळी सर करण्यास आणि १९,७५० ची पातळी राखण्यास निफ्टी निर्देशांक वारंवार अपयशी ठरल्यास निर्देशांकाचे खालचे लक्ष्य १९,२५० ते १९,००० असेल. जे आता घडताना दिसते आहे. येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांक सातत्याने १९,९५० च्या पातळीवर टिकल्यास मंदीचे मळभ दूर होईल. अन्यथा निफ्टी निर्देशांकाच्या खालच्या लक्ष्याची अनुक्रमे १९,२५० ते १९,००० पातळीची तयारी ठेवावी.
हेही वाचा – “ज्येष्ठ आणि चतुरस्र अर्थमंत्री”… प्रणव मुखर्जी
शिंपल्यातील मोती
केएनआर कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड
(शुक्रवार, २० ऑक्टोबरचा भाव २७४.८० रु.)
केएनआर कन्स्ट्रक्शन्स ही ईपीसी (इंजिनिअरिंग प्रोक्युअरमेंट ॲण्ड कन्स्ट्रक्शन्स) या क्षेत्रात कार्यरत आहे. अतिविशाल, अजस्र बांधकाम म्हणजेच ज्यात उड्डाणपूल, रस्ते बांधणी, त्यांची देखभाल, सिंचन व शहरात जीवनावश्यक अशा पाण्याच्या सुविधांची निर्मिती व नियोजन या क्षेत्रांमधील आघाडीची कंपनी आहे. त्यामुळे ‘केएनआर कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड’ हा समभाग आपला आजचा शिंपल्यातील मोती असणार आहे.
आर्थिक आघाडीवर कशी?
गेल्या दोन आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या तिमाहीतील कामगिरीचा तुलनात्मक आढावा घेतल्यास विक्री ८९०.६० कोटींवरून ९२९.५९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कंपनीचा करपूर्व नफा १३४.४५ कोटींवरून १४६.९६ कोटींवर, तर निव्वळ नफा १००.८४ कोटींवरून ११०.२६ कोटींवर झेपावला आहे.
‘केएनआर कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड’ या समभागाचे आलेख वाचन करता समभागाने आपल्याभोवती २५० ते २९० रुपयांचा परीघ (बॅण्ड) निर्माण केला आहे. भविष्यात समभाग २९० रुपयांच्यावर सातत्याने पंधरा दिवस टिकल्यास अल्पमुदतीसाठी वरचे लक्ष्य अनुक्रमे ३२० ते ३५० असेल. तर दीर्घमुदतीसाठी वरचे लक्ष्य ५०० रुपये असेल. सध्या बाजारात घसरण सुरू आहे. यामुळे समभाग जेव्हा २६० ते २३० रुपयांदरम्यान येईल, तेव्हा हा समभाग खरेदी करावा. या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीसाठी १९० रुपयांवर नुकसान प्रतिबंध (स्टॉप लॉस) ठेवावा.
हेही वाचा – बाजारातील माणसं : व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती!
महत्त्वाची सूचना:- वरील समभागात लेखकाची स्वतःची अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचा तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांना सादर केले आहे.
निकालपूर्व विश्लेषण
१)ॲक्सिस बँक लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, २५ ऑक्टोबर
२० ऑक्टोबरचा बंद भाव – ९८०.३० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ९९० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ९९० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,०४० रुपये, द्वितीय लक्ष्य १,०९० रुपये.
ब) निराशादायक निकाल : ९९० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ९३० रुपयांपर्यंत घसरण.
२) एसीसी लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल- गुरुवार, २६ ऑक्टोबर
२० ऑक्टोबरचा बंद भाव- १,९६२.३५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,९५० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,९५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,०५० रुपये, द्वितीय लक्ष्य २,२०० रुपये.
ब) निराशादायक निकाल : १,९५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,८८० रुपर्यंत घसरण.
३) एशियन पेंट लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २६ ऑक्टोबर
२० ऑक्टोबरचा बंद भाव – ३,१०५.३५
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ३,०८० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,०८० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,२०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,३०० रुपये.
ब) निराशादायक निकाल : ३,०८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३,०५० रुपयांपर्यंत घसरण.
४) केपीआयटी टेक्नॉलॉजी लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, ३० ऑक्टोबर
२० ऑक्टोबरचा बंद भाव – १,१९६.१० रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,१५० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,१५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,३२५ रुपये, द्वितीय लक्ष्य १,४०० रुपये.
ब) निराशादायक निकाल : १,१५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,०५० रुपयांपर्यंत घसरण.
५) लार्सन ॲण्ड टुब्रो लिमिटेड
तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, ३१ ऑक्टोबर
२० ऑक्टोबरचा बंद भाव – ३,०१२.०५ रु.
निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर:- ३,००० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,००० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,१०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,२०० रुपये.
ब) निराशादायक निकाल : ३,००० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,८५० रुपयांपर्यंत घसरण.
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : – शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.