अजय वाळिंबे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

(बीएसई कोड ५४३६५०)

प्रवर्तक : एनसीबीजी होल्डिंग्स इन्क /व्हीएनजी टेक्नॉलॉजी

बाजारभाव: रु. २५९/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : संरक्षण क्षेत्रासाठी इलेक्ट्रॉनिक्स सामग्री

भरणा झालेले भागभांडवल: रु. १५.४८ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ७१.७२

परदेशी गुंतवणूकदार ४.००

बँक/ म्यु. फंड/ सरकार १३.९३

इतर/ जनता १०.३५

पुस्तकी मूल्य: रु. १७

दर्शनी मूल्य: रु. २/-

लाभांश: –%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ८.४८

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३८.२

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४१

डेट इक्विटी गुणोत्तर: ३.९७

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ७.६७

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : २१.६

बीटा: ०.९

बाजार भांडवल: रु. २,५०७ कोटी (मायक्रो स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : ३२० / २५०

महिन्याभरापूर्वी मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध झालेली डीसीएक्स सिस्टीम्स ही इलेक्ट्रॉनिक उप-प्रणाली आणि केबल हार्नेसच्या निर्मितीमध्ये अग्रगण्य भारतीय कंपन्यापैकी एक आहे. दहा वर्षांपूर्वी म्हणजे, २०११ मध्ये कंपनीने कामकाज सुरू केले आणि अल्पावधीतच एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रासाठी इलेक्ट्रॉनिक्स सामग्री बनविण्यासाठी परदेशी मूळ उपकरण उत्पादकांसाठी प्राधान्यकृत भारतीय ऑफसेट भागीदार म्हणून डीसीएक्सची निवड झाली.

डीसीएक्स प्रामुख्याने रडार सिस्टीम, सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक युद्ध सुसज्जता, क्षेपणास्त्रे आणि दळणवळण प्रणालीच्या क्षेत्रात ‘सिस्टीम इंटिग्रेशन’मध्ये काम करते. कंपनीच्या एकूण महसुलापैकी सुमारे ८२ टक्के महसूल ‘सिस्टीम इंटिग्रेशन’मधून येतो तर १२ टक्के महसूल ‘किटिंग’मधून येतो. यात इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रो-मेकॅनिकल भागांचे असेम्ब्ली-रेडी किट आणि सोर्सिंगचा समावेश होतो. याखेरीज कंपनी संप्रेषणासह विविध वापरासाठी केबल्स आणि वायर हार्नेस यांची असेम्ब्ली करते. यांत रेडिओ फ्रिक्वेन्सी केबल्स, को-एक्सियल, मिक्स्ड-सिग्नल, पॉवर आणि डेटा केबल्सचा समावेश आहे. तसेच एरोस्पेस आणि संरक्षण उद्योगांसाठी ग्राहकांच्या गरजेनुसार प्रणाली, सेन्सर्स, क्षेपणास्त्र प्रणाली, लष्करी आर्मर्ड वाहने आणि इतर इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली इ. साठी याचा वापर होतो.

गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने ५६ टक्के महसूल निर्यातीद्वारे मिळविला. कंपनीचे प्रमुख ग्राहक इस्रायल, कोरिया आणि उत्तर अमेरिकेत आहेत. देशांतर्गत ग्राहकांमध्ये संरक्षण आणि एरोस्पेस ते अंतराळ उपक्रम आणि रेल्वे अशा विविध क्षेत्रांमधील खासगी कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा समावेश आहे. कंपनीच्या उत्पादनांना मोठी मागणी असून ३० जून २०२२ पर्यंत डीसीएक्सचे ऑर्डर बुक ₹ २,५६५ कोटी रुपये आहे.

सप्टेंबर २०२२ साठी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीसाठी कंपनीने १७३.८८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ७.८७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने ५.७७ कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. कंपनीचा सुमारे ५०० कोटी रुपयांचा ‘आयपीओ’ प्रति शेअर २०५ रुपये अधिमूल्याने गेल्याच महिन्यात आला होता आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. ‘आयपीओ’च्या रकमेतून कंपनी आपला बहुतांशी कर्जभार कमी करेल आणि त्याचा सकारात्मक परिणाम नफ्यावर होईल. ७० पटीने भरणा झाल्याने अनेकांना हे शेअर्स मिळाले नसतील. मात्र बाजारातून खरेदी केल्यास सध्या २५० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर एक दीड वर्षांत उत्तम परतावा देऊ शकेल.

सध्याची बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

stocksandwealth@gmail.com

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या माहितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Part of countrys defense self reliance dcx systems limited asj