अमेरिकेत १९ जानेवारी १९४४ रोजी न्यूटन या गावी जन्माला आलेले पीटर लिंच आज ८० वर्षांचे आहेत. म्युच्युअल फंड व्यवस्थापक म्हणून त्यांनी केलेल्या कामाची आजदेखील सर्वत्र दखल घेतली जाते. सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेले पीटर लिंच निवृत्तीनंतरचे आयुष्य चांगल्याप्रकारे व्यतीत करत आहेत. आजदेखील त्यांचे नाव का घेतले जाते, तर वर्ष १९७७ ते १९९० दरम्यान फिडिलिटी मॅकलान फंडाचे ते फंड व्यवस्थापक होते. या कालावधीत या फंडाने २९.२ टक्के चक्रवाढीने वार्षिक सरासरी परतावा मिळवून दिला. या योजनेचा आधारभूत निर्देशांक एस अँड पी ५०० या निर्देशांकाच्या दुप्पट परतावा त्यांच्या योजनेचा होता. सर्वोत्तम कामगिरी करणारा हा फंड होता. या फंडाने केलेला विक्रम अजूनही कोणीही मोडू शकलेला नाही. १३ वर्षांच्या कालावधीत मालमत्ता १८ दशलक्ष डॉलरवरून १४ अब्ज डॉलरवर पोहोचली.
पीटर लिंच कायम मूल्यांवर आधारित गुंतवणूक पद्धतीचे समर्थन करायचे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यापैकी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड या विषयाशी संबंधित असलेली दोन पुस्तके आहेत. एक वर्ष १९८९ मध्ये प्रसिद्ध झालेले वन अप ऑन वॉल स्ट्रीट आणि वर्ष १९९३ मध्ये प्रसिद्ध झालेले दुसरे पुस्तक बिटिंग द स्ट्रीट आहे. या दोन पुस्तकांचा अभ्यास केला तर पीटर लिंच यांची विचारसरणी, गुंतवणूक निर्णय घेण्याची क्षमता, अमेरिकी शेअर बाजार, अमेरिकी म्युच्युअल फंड उद्योग अशा अनेक विषयांची अभ्यासपूर्ण माहिती मिळू शकते. पुस्तकातील उदाहरणे अमेरिकेतल्या कंपन्यांच्या संबंधातील असली तरी त्यात व्यक्त झालेले विचार जगभराच्या बाजारात वापरता येतात.
हेही वाचा… बाजार रंग : लाटांवर स्वार होताना
जे तुम्हाला याअगोदरच माहिती आहे. त्याचा वापर बाजारात पैसे कमावण्यासाठी कसा करावा. बाजारात पैसे कमवताना फक्त सामान्य ज्ञान, निरीक्षण लागते आणि नेमके तेच गुंतवणूकदारांकडे नसते. पीटर लिंच १० वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. गुंतवणुकीच्या क्षेत्रात कोणतीही व्यक्ती आयुष्यात प्रथम कोणता शेअर खरेदी केला हे कधीही विसरू शकत नाही. पीटर लिंच यांनी फ्लाइंग टायगर या कंपनीचा पहिला शेअर खरेदी केला. व्हिएतनाम युद्ध सुरू झाले आणि कंपनीला प्रचंड पैसा मिळाला. कारण बोटीने या देशात जाण्याची कोणाची तयारी नव्हती आणि त्यामुळे पीटर लिंच यांनी १० डॉलरला घेतलेला शेअर ८० डॉलरवर पोहोचला.
उत्कृष्ट कंपन्या तुमच्या घराच्या मागील अंगणात असतात तुम्ही त्या रोज बघत असतात. यामुळे आपले कान, नाक, डोळे उघडे ठेवले तर अनेक चांगल्या कंपन्या आणि त्यांची प्रगती बघता येते. शेवटी कंपनीची प्रगती झाली तर शेअरचा बाजारभाव वाढेल. यासाठी पीटर लिंच वेगवेगळ्या वस्तूंचा खप बाजारात कसा होत आहे? याकडे लक्ष ठेवायचे. हे जर करता आले तर नक्कीच फायदा पदरी पडेल.
गुंतवणूकशास्त्र जेवढे महत्त्वाचे त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे विषय इतिहास, मानसशास्त्र, राज्यशास्त्र हे आहेत. गुंतवणुकीचे निर्णय घेताना तर्कशास्त्र असावे लागते. आपण यश मिळवले याचे श्रेय स्वतःकडे घेण्याऐवजी ते फिडिलिटी म्युच्युअल फंडाचे मालक आणि त्यांच्या अगोदरच्या व्यवस्थापकांना देतात आणि न्यूटन जे सांगायचा तेच पीटर लिंच सांगतात की, मला दुरवरचे का दिसू शकते? तर मी मोठ्या व्यक्तीच्या खांद्यावर बसलेलो आहे.
सुरुवातीला फिडिलिटीकडे ते उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रशिक्षण घेण्यासाठी आले होते आणि त्यानंतर मग व्हॉर्टनला त्यांनी शेअर बाजार समजावून घेतला. मात्र शिक्षण घेत असताना जे ज्ञान मिळाले, त्यापेक्षा कामाचा अनुभव जास्त शिकवून गेला.
हेही वाचा… ‘मलेशिअन डेव्हलपमेंट बरहाद’ : घोटाळ्यांचा बाप! (भाग २)
काही वेळा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने जे सांगितले ते ऐकायचे नाही असेसुद्धा त्यांनी फंडाचे व्यवस्थापन करत असताना केले. फिडिलिटीचे त्यावेळचे प्रमुख निड जॉनसन यांनी त्यांना फंडाकडे असलेली शेअरची संख्या ४० वरून २५ पर्यंत खाली आणायला सांगितली. पण त्यांनी नेमके त्यांच्याविरुद्ध केले. शेअरची संख्या ६० पर्यंत वाढवली. सहा महिन्यांनंतर १०० पर्यंत संख्या वाढवली आणि त्यानंतर तर १५० कंपन्यांचे शेअर फंडाकडे झाले. मात्र या त्यांच्या निर्णयाला विरोध न होता मान्यता मिळाली. त्याचे कारणही त्यांनी स्पष्टपणे असे सांगितले की, जेव्हा बाजारात अनेक चांगल्या कंपन्यांचे शेअर अत्यंत कमी भावात उपलब्ध होते, तेव्हा ते खरेदी करण्याचा मोह मी टाळू शकलो नाही. पुढे पुढे तर या निर्णयाची बाजारात चेष्टामस्करी सुरू झाली. कारण एकूण १,४०० कंपन्यांच्या शेअरमध्ये लिंच यांनी गुंतवणूक केली होती. म्हणून बाजारात असा शेअर दाखवा की, जो लिंच यांनी खरेदी केलेला नाही, अशाही प्रकारे त्यांची टिंगलटवाळी करण्यात आली. पीटर लिंच यांच्याविषयी बरेच काही लिहिता येईल, परंतु तूर्तास एवढे पुरेसे….
(लेखक नाशिकस्थित भांडवली बाजाराचे अभ्यासक आहेत.)