PhonePe IPO: भारतातील सर्वात मोठी फिनटेक कंपनी फोन पे भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची योजना आखत आहे. यासाठी कंपनीने त्यांच्या संभाव्य आयपीओची तयारी देखील सुरू केली आहे. कंपनीने नुकतीच याबद्दल माहिती दिली आहे. फोन पे ने एका निवेदनात म्हटले आहे की, “कंपनी त्यांच्या संभाव्य आयपीओबाबत प्रारंभिक पावले उचलत आहे आणि भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याची योजना आखत आहे.”
या निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, “फोन पे या वर्षी आपला १०वा वर्धापन दिन साजरा करत आहे, त्यामुळे कंपनीसाठी हा एक महत्त्वाचा क्षण आहे. कंपनीने नाविन्यपूर्ण वित्तीय सेवा आणि तंत्रज्ञान उपायांसह लाखो ग्राहकांना सेवा देण्यासाठी प्रगती केली आहे. फोनपे कंपनी डिसेंबर २०२२ मध्ये सिंगापूरहून भारतात स्थलांतरित झाली आहे. यासाठी त्यांना सरकारला सुमारे ८,००० कोटी रुपयांचा कर भरावा लागला. फोनपे डिजिटल पेमेंट अॅप ऑगस्ट २०१६ मध्ये लाँच करण्यात आले होते. जानेवारी २०२५ पर्यंत, कंपनीकडे ५९ कोटींहून अधिक नोंदणीकृत युजर्स आणि ४ कोटींहून अधिक व्यापाऱ्यांचे डिजिटल पेमेंट नेटवर्क आहे. फोनपे द्वारे दररोज ३१ कोटींहून अधिक व्यवहार होतात, ज्याचे वार्षिक एकूण पेमेंट मूल्य (TPV) १४५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
भारतात फोनपे आघाडीवर आहे
भारतातील प्रमुख यूपीआय अॅप्सच्या यादीत फोन पे आघाडीवर आहे. भारतात, यूपीआय वापरणारे बहुतेक लोक फोन पे चा वापर करतात. फोन पे युजर्सची संख्या गुगल पे आणि पेटीएमपेक्षा खूप जास्त आहे. नोव्हेंबर २०२४ पर्यंत, फोनपे ही ४७.८ टक्के युजर्ससह देशातील सर्वात मोठी यूपीआय पेमेंट कंपनी होती. तर गुगल पे ही देशातील दुसरी सर्वात मोठी फिनटेक कंपनी होती ज्याचा बाजारातील हिस्सा ३७ टक्के होता. अमेरिकेतील आघाडीची रिटेल स्टोअर कंपनी वॉलमार्टची फोन पे मध्ये सर्वात मोठी भागीदारी आहे. कंपनीने २०२४ च्या वार्षिक अहवालात म्हटले होते की, जगातील विविध आघाडीच्या गुंतवणूकदारांनी फोन पे मध्ये १८,००० कोटी रुपये गुंतवले आहेत.
कोण आहेत फोन पे चे मालक?
३१ मार्च २०२४ पर्यंत, वॉलमार्टची लक्झेंबर्गस्थित कंपनी, एफआयटी होल्डिंग्ज एसएआरएल चा फोन पे मध्ये ८३.९१ टक्के मालकी होती. तर, जनरल अटलांटिक सिंगापूरकडे ५.१४% आणि फोन पे च्या सिंगापूरस्थित उपकंपनीकडे कंपनीमध्ये ६.७ टक्के मालकी होती.