ईआयएच लिमिटेड
(बीएसई कोड: ५००८४०)
संकेतस्थळ: http://www.eihcltd.com
प्रवर्तक: ओबेरॉय समूह
बाजारभाव: रु. ४४२/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : हॉटेल्स आणि रिसॉर्टस
भरणा झालेले भाग भांडवल: रु. १२५.०७ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ३२.८५
परदेशी गुंतवणूकदार ५.२५
बँक /म्युच्युअल फंड/ सरकार १३.७७
इतर/ जनता ४८.१३
पुस्तकी मूल्य: रु. ६३
दर्शनी मूल्य: रु. २/-
गतवर्षीचा लाभांश: ६०%
प्रति समभाग उत्पन्न: रु.१०.२
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४३
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४६.२
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०५
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ४८.६
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड : २३.६
बीटा : १
बाजार भांडवल: रु. २७,६६९ कोटी (लार्ज कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ५६६/२०३
गुंतवणूक कालावधी : २४-३० महिने
हेही वाचा…पाकिस्तानी बायकोच्या सहभागाचा घोटाळा
वर्ष १९४९ मध्ये स्थापन झालेली ईआयएच लिमिटेड ही ओबेरॉय समूहाची प्रमुख कंपनी आहे. तिची स्थापना दिवंगत राय बहादूर एम.एस.ओबेरॉय यांनी केली होती. ईआयएच म्हणजेच पुर्वश्रमीचे ईस्ट इंडिया हॉटेल्स. कंपनी प्रामुख्याने प्रीमियम लक्झरी हॉटेल्स व्यवसायात असून ओबेरॉय, ट्रायडेंट आणि मेडेन्स ब्रँड अंतर्गत व्यवस्थापन करण्यात कार्यरत आहे. या खेरीज ईआयएच फ्लाइट केटरिंग, विमानतळ रेस्टॉरंट्स, प्रकल्प व्यवस्थापन आणि कॉर्पोरेट एअर चार्टर्स इ. व्यवसायात देखील कार्यरत आहे. ओबेरॉय समूह भारतात तसेच परदेशात गेली साठहून अधिक वर्ष लक्झरी हॉस्पिटॅलिटी व्यवसायात आहे. कंपनीची परदेशात इंडोनेशिया, मॉरिशस, इजिप्त आणि संयुक्त अरब अमिराती येथे हॉटेल व्यवस्थापन असून भारतात २४ ठिकाणी हॉटेल्स व्यवस्थापन आहे.
कंपनीकडे ओबेरॉय, ट्रायडेंट तसेच मेडेन या प्रसिद्ध नाममुद्रा (ब्रॅंड) असून तिचा व्यवसाय पुढील प्रमाणे विस्तारला आहे.
(१) ओबेरॉय हॉटेल्स – या नाममुद्रेअंतर्गत, कंपनीची २० हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स असून कंपनी इजिप्तमध्ये दोन लक्झरी रिव्हर नाईल क्रूझर चालवते.
(२) ट्रायडेंट हॉटेल्स – या नाममुद्रे, कंपनी भारतातील ९ शहरांमध्ये १० हॉटेल्स चालवते.
(३) मेडेन हॉटेल – मेडेन हॉटेल हे दिल्लीतील एकमेव हॉटेल आहे.
कंपनीच्या आपल्या तीन भारतीय उपकंपन्याद्वारे मुमताज हॉटेल्स लिमिटेड, मशोब्रा रिसॉर्ट लिमिटेड आणि ओबेरॉय केरळ हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स लिमिटेड या हॉटेल्स व्यवस्थापनाचा संयुक्त उपक्रम राबवत आहे. तसेच कंपनीची ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेड ही सूचिबद्ध कंपनी आहे. आपल्या इतर व्यवसायासाठी कंपनीच्या तीन जेव्ही कंपन्या आहेत, एक देशांतर्गत म्हणजेच मर्क्युरी कार रेंटल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि दोन परदेशी त्यामध्ये ओबेरॉय मॉरिशस लिमिटेड आणि आयलंड रिसॉर्ट्स लिमिटेड (ओबेरॉय मॉरिशस लिमिटेडची उपकंपनी) यांचा समावेश आहे.
हेही वाचा…Stock Market Today : ‘ब्लूचिप’ कंपन्यांमधील खरेदीच्या जोमाने निफ्टी नव्या उंचीवर
नवीन प्रकल्प:
१. ओबेरॉय राजगड पॅलेस, खजुराहोजवळ वसलेला एक लक्झरी प्रकल्प विकसित केला जात आहे. हे रिसॉर्ट पन्ना जंगलाला लागून असलेल्या ६२ एकर जागेवर उच्च दर्जाचे निवासस्थान देईल.
२. कंपनीने गोव्यातील ५५ एकर समुद्रकिनाऱ्या समोरच्या मालमत्तेसाठी जमीन वापरण्याची संमती प्राप्त केली आहे.
३. बेंगळुरू येथील ओबेरॉय हॉटेलसाठी नियोजन प्रक्रिया सुरू आहे.
४. बांधवगड राष्ट्रीय उद्यानापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर २२ एकर जागेवर असलेल्या ओबेरॉय वाइल्डलाइफ रिसॉर्ट बांधवगढ येथे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
५. ओबेरॉय आणि ट्रायडंट, कोहतान बेटावर, कोह सामुई, थायलंडच्या नैऋत्येस दोन रिसॉर्ट्स विकसित करत आहे.
६. ओबेरॉय काठमांडू येथे पाच एकरच्या ग्रीनफिल्ड साइटवर विकसित केले जात आहे.
७. नेपाळमधील बर्दिया नॅशनल पार्कजवळ असलेले ओबेरॉय वाइल्डलाइफ रिसॉर्ट सुमारे ३० एकरावर विकसित केले जाईल.
८. लक्सर आणि अस्वान दरम्यान नाईल नदीकाठी एक लक्झरी नाईल क्रूझर २५ केबिनसह नियोजित आहे.
९. आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे ट्रायडेंट रिसॉर्टची योजना आहे.
१०. मुमताज हॉटेल्स लिमिटेडने गांडीकोटा, आंध्रप्रदेश येथे ६० कोर्टींचे लक्झरी रिसॉर्टचे काम चालू असून येत्या तीन वर्षांत ते कार्यान्वित होईल.
हेही वाचा…बाजार रंग: निवडणूक निकाल, मृगाचा पाऊस आणि महागाई
मार्च २०२४ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षामध्ये कंपनीने उत्तम कामगिरी करून दाखवली असून २,५११ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ६४५.९ कोटी रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो ६५ टक्क्यांनी अधिक आहे. तर मार्च २०२४ साठीच्या तिमाहीसाठी कंपनीने उलाढालीत १६ टक्क्यांची वाढ दाखवून ती ७४१ कोटींवर पोहोचली आहे. तर नक्त नफा ६२ टक्के वाढीसह २१२ कोटींवर गेला आहे. कंपनी हॉटेल्स व्यवस्थापन करून ॲसेट लाइट मॉडेल वापरते, त्यामुळे कंपनीला त्यांचे कर्ज कमी पातळीवर ठेवण्यास मदत केली आहे. कंपनीची एकूण मालमत्ता ३,००० कोटींहून अधिक असून केवळ १९९ कोटी रुपयांचे कर्ज आहे. पर्यटनाची वाढती मागणी पाहता एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून ईआयएच हॉटेल्सचा विचार करायला हरकत नाही.
हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत कंपनीच्या संचालक मंडळाने एकास एक प्रमाणात बोनस जाहीर केला आहे.सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजारभावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्या-टप्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
stocksandwealth@gmail.com
-प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहिती प्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनी कडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तु घेतलेली नाही.
-हा गुंतवणूक सल्ला नाही
-लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअर मधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.