वर्ष १९६८ मध्ये स्थापन झालेली रोटो पंप्स लिमिटेड ही भारतातील प्रोग्रेसिव्ह कॅविटी पंप्सची अग्रणी उत्पादक आहे. कंपनी सांडपाणी, साखर, कागद, रंग (पेंट), तेल आणि वायू, रसायने आणि विविध प्रकारच्या उद्योगांना कार्यक्षम आणि विश्वासार्ह ‘पंपिंग सोल्यूशन्स’ प्रदान करते. उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे कंपनीचा उत्पादन प्रकल्प असून कंपनीच्या उत्पादनात प्रोग्रेसिव्ह कॅविटी पंप्स आणि ट्विन स्क्रू पंप्सचा समावेश आहे. ज्यामुळे पंपिंगच्या विविध गरजा पूर्ण होतात. प्रोग्रेसिव्ह कॅव्हिटी पंप्सचा उपयोग द्रव रूपातील म्हणेजच अत्यंत चिकट, तसेच संवेदनशील पदार्थांचे पंपिंगमध्ये वाहन करण्यासाठी होतो तर ट्विन स्क्रू पंप स्वच्छ, वंगण (लुब्रीकेटिंग) आणि इतर ज्वलनशील द्रवपदार्थांसाठी वापरले जातात.
कंपनीची उत्पादने विविध प्रक्रियेत म्हणजे सिरॅमिक्स, अन्न आणि पेये, ऊर्जा, खाणकाम, सागरी आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रात वापरली जातात. तसेच पन्नासहून अधिक देशांमध्ये यशस्वीरीत्या निर्यातही होतात. रोटो पंप्सच्या मशीन शॉपमध्ये सीएनसी मशीन, स्पेशल पर्पज मशिन्स, इन हाऊस टूल रूम इत्यादींसह अत्याधुनिक मशीनचा समावेश आहे. कंपनीचे उद्दिष्ट कार्यकारी क्षमता आणि नफा राखणे आहे. चार वर्षांपूर्वी कंपनीने प्रोग्रेसिव्ह कॅविटी पंपमधील नवीन उच्च कार्यक्षम देखभालीच्या डिझाइन कंपनीची नेमणूक केली आहे. त्याचा फायदा गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता कायम राखण्यात होत आहे. रोटो पंप्सची प्रस्थापित बाजारपेठेतील स्थिती आणि प्रवर्तकांचा प्रदीर्घ अनुभव यामुळे गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये वार्षिक १९ टक्के वृद्धी दराने महसूल वाढला. विविध क्षेत्रांतील उत्पादनाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी उत्पादने विकसित करण्याची क्षमता कंपनी मध्यम कालावधीत वाढवू शकते.
गेल्या आर्थिक वर्षांत २२६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३३ कोटी रुपयांचा नफा कामावणाऱ्या रोटो पंप्सने सप्टेंबर २०२३ साठीच्या तिमाहीत उत्तम निकाल जाहीर केले होते. या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने ८२ कोटी (४६ टक्के वाढ) रुपयांच्या उलाढालीवर १३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तिमाहीच्या तुलनेत तो ७८ टक्क्यांनी अधिक आहे. उत्तम अनुभवी प्रवर्तक आणि अत्यल्प कर्ज असलेल्या रोटो पंप्सकडून आगामी कालावधीत उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. गेल्याच वर्षात कंपनीने भागधारकांना १:१ प्रमाणात बक्षीस समभागांचे (बोनस शेअर) वाटप केले होते. सध्याच्या अनिश्चित बाजारात एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून या स्मॉलकॅप बहुराष्ट्रीय कंपनीचा पोर्टफोलियोमध्ये समावेश करू शकता.
सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत आणि टप्प्यप्प्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
रोटो पंप्स लिमिटेड
(बीएसई कोड ५१७५००)
http://www.rotopumps.com
प्रवर्तक: हरिश्चंद्र गुप्ता
बाजारभाव: रु. ४०९/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: इंजिनीयरिंग/औद्योगिक पंप्स
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ६.२८ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ६७.२६
परदेशी गुंतवणूकदार ६.१९
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार —
इतर/ जनता २६.५३
पुस्तकी मूल्य: रु. ५६.२
दर्शनी मूल्य: रु. २/-
लाभांश: १५८%
प्रति समभाग उत्पन्न: रु. १२.९
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३१.८
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३२
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.२७
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १४.९
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (आरओसीई): २५.८
बीटा : ०.९
बाजार भांडवल: रु. १२८७ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ४३८/२१४
अजय वाळिंबे
Stocksandwealth@gmail.com
हा लेख गुंतवणूक सल्ला नव्हे. प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअरमध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १ टक्केपेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.