आजपासून बरोबर पाच महिन्यांपूर्वी या स्तंभातून ‘टीसीएस विका आणि तूर घ्या’ असा सल्ला देणारा लेख लिहिला होता. वरवर बघता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससारख्या (टीसीएस) जागतिक पातळीवरील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपनीची तुलना तूर या केवळ भारतीय लोकांसाठी महत्त्वाच्या एका कडधान्याशी केल्यामुळे थोडा वेगळा आणि विचित्र वाटणारा हा मथळा काही गुंतवणूकदारांना रुचला नसावा. परंतु त्यावेळची शेअर बाजारातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मरगळ आणि दुष्काळामुळे कमॉडिटी बाजारात निर्माण झालेली परिस्थिती याची सांगड घालून एक वेगळी स्ट्रॅटेजी किंवा गुंतवणूकदारांसाठी वेगळी व्यूहरचना या चष्म्यातून या लेखाकडे पाहण्याची गरज होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे ही स्ट्रॅटेजी कमालीची यशस्वी ठरल्याचे दिसून आले आहे. त्यावेळी ९,००० रुपये क्विंटलवर असलेली तूर या महिन्यात १३,००० रुपयांवर गेली, तर ४,००० रुपयांवर असलेला टीसीएसचा शेअर फेब्रुवारी महिन्यात ४,१८४ रुपयाचा उच्चांक करून मेअखेर ३,६७० पर्यंत घसरला. अलीकडील काळात गुंतवणूकदार कायम नवीन ‘थीम’च्या शोधात असतात. त्यादृष्टीने कमॉडिटी बाजारावर बारीक लक्ष ठेवल्यास अशा अनेक स्ट्रॅटेजीज् निर्माण होत असतात. एवढेच नाही तर कमॉडिटी बाजारातील कल अनेकदा शेअर बाजाराला अगोदरच दिशा दाखवण्याचे काम करत असतो, हे आजच्या लेखावरून लक्षात येईल.

हेही वाचा..बाजारातली माणसं: डेरिव्हेटिव्ह्जचा जन्मदाता- आशीषकुमार चौहान.

त्यामुळे कमॉडिटी बाजारात वेगाने बदलत चाललेल्या परिस्थितीचा विचार करता आता वरील स्ट्रॅटेजी ‘रिव्हर्स’ करणे योग्य ठरेल. म्हणजेच तुरीमधील तेजी आता संपली असून त्यात मंदीसाठी निमित्ताच्या (ट्रिगर) प्रतीक्षेत आहे. म्हणून तुरीचे साठे विकून आलेल्या पैशातून आता परत टीसीएसच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास येत्या तीन तिमाहींमध्ये भांडवल सुरक्षितता आणि बरा परतावा या गोष्टी साध्य करता येतील. टीसीएसमध्ये तेजी का येईल याबद्दल माहिती इतरत्र उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, मागील चार-पाच महिन्यांत कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील बदलांना अनुसरून केलेले कामकाजातील बदल, आयटी क्षेत्रासाठी निर्माण झालेली सकारात्मकता आणि येत्या काळात निफ्टीच्या वाढीत या क्षेत्राकडून मिळू शकणारे योगदान अशा अनेक गोष्टींमुळे आता टीसीएस आकर्षक वाटत आहे. तसेच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जूनमध्ये संपलेल्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निष्कर्ष सादर करण्यापूर्वी नेहमी येणारी तेजी येऊन टीसीएसचा शेअर कदाचित ४,४००-४,५०० रुपयांचा नवीन उच्चांक गाठणे पुढील काळात शक्य असल्याचे या क्षेत्रातील जाणकार म्हणत आहेत.

परंतु तुरीमध्ये मंदी आली तर किती असेल, त्याची कारणे काय याबद्दल विस्तृत माहिती आपण आज घेणार आहोत.

आपण यापूर्वीच अनेकदा कडधान्य टंचाई, खाद्यमहागाई, केंद्राचे निर्बंध याबाबत विस्तृत चर्चा केल्यामुळे उडीद आणि तुरीचे मागील वर्षात घसरलेले उत्पादन आणि त्यामुळे गगनाला भिडलेल्या किमती याबाबत सर्वांनाच पुरेशी माहिती आहे. केंद्राने हा प्रश्न सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्यामुळे मोठी टंचाई असूनसुद्धा महागाई नियंत्रणात राहिली याचे श्रेय सरकारला द्यावेच लागेल. परंतु त्यासाठी खुली केलेली कडधान्य आयात आणि त्यामुळे परदेशातून वाटाणा, मसूर, उडीद, तूर आणि चणा यांची मागील १२ महिन्यांत सुमारे ४५-५० लाख टन एवढी प्रचंड आयात, साठे मर्यादेसारख्या (स्टॉक लिमिट) गोष्टींमुळे शेतकऱ्यांना क्वचितच मिळू शकणारा नफा खूप कमी झाला, तर कधी त्याचे नुकसानदेखील झाले. याची फार मोठी किंमत सरकारने लोकसभा निवडणुकीत चुकवली आहे. आता परिस्थिती बदलू लागली आहे. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा सचिव निधी खरे यांनी अलीकडेच म्हटले आहे की, कडधान्यांच्या किमती पाऊस सुरू झाल्यावर जुलैमध्ये कमी होऊ लागतील. त्यामागची कारणे अनेक आहेत.

हेही वाचा…माझा पोर्टफोलियो – लहानग्यांच्या ‘एंजल’ची दिगंत कीर्ती

सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर्षभर राहिलेल्या तेजीमुळे आणि चांगल्या मोसमी पावसाच्या अनुमानांच्या पार्श्वभूमीवर तुरीचे क्षेत्र १५-२० टक्के वाढून त्या प्रमाणात उत्पादन वाढीच्या अपेक्षा निर्माण झाल्यामुळे तुरीच्या किमतीत मागील १५ दिवसांत थोडी घट झाली असली तरी जूनमधील आतापर्यंतचा पाऊस अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. तरीही जुलैमध्ये चांगला पाऊस आणि हंगामाच्या शेवटी वाढीव पाऊस तुरीला पोषक ठरेल असे चित्र सध्या आहे. अर्थात सर्व म्हटल्याप्रमाणे झाले तरी प्रत्यक्ष तुरीचा पुरवठा वाढायला जानेवारी उजाडणार आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

दुसरे कारण म्हणजे, तुरीबरोबरच एकंदर कडधान्यांची मोठ्या प्रमाणात यापूर्वीच झालेली आणि येत्या काळात होणारी आयात. पिवळा वाटाणा आयात २० लाख टनांवर गेली असून अजून दोन-तीन लाख टन तरी लवकरच येईल. मसूर आयात १२-१३ लाख टन झाली आहे. तर येत्या काळात आफ्रिकेतून नवीन तुरीचे उत्पादन, तेदेखील कमी किमतीत आयात होणार आहे. सप्टेंबरपासून खरिपातील मूग, उडीद बाजारात येईल तर नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियामधून नवीन हंगामातील देशी चणा आयात सुरू होईल. त्यामागोमाग खरिपातील तूर बाजारात येण्यास तयार होईल. एकंदर पाहता पुरवठा साखळी चांगली राहिल्याने किमती नरम होणारच यात शंका नाही.

हेही वाचा…परदेशी गुंतवणूक ओघाने, निर्देशांकांची उच्चांकी झेप

वरील गोष्टी मध्यम अवधीतील कडधान्य पुरवठा सुरळीत करणार असले तरी पुढील दोन-तीन महिन्यांत अन्न-महागाई चढीच राहणार आहे. कारण भीषण पाणीटंचाई आणि यावेळी पाऊस यामुळे अलीकडील काळात भाजीपाला उत्पादन घटले असून कांदा, टोमॅटो आणि बटाट्यासकट सर्व भाज्यांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे कडधान्यांची मागणी वाढून महागाई वाढली आहे. अशावेळी सरकारने साठे मर्यादा या शस्त्राचा वापर करण्याचे ठरवले आहे.

३० सप्टेंबरपर्यंत केंद्राने तूर, चणा आणि काबुली चणा यावर घाऊक आणि किरकोळ व्यापारी, रिटेल साखळ्या, आणि डाळमिल यांच्यासाठी त्यांच्या वापराच्या अनुषंगाने विविध साठे मर्यादा लागू केल्या आहेत. तर आपल्याकडील साठे संकेतस्थळावर दर आठवड्याला जाहीर करण्याचे बंधन यापूर्वीच घातले आहे. यामुळे नजीकच्या काळातील पुरवठा बऱ्यापैकी सुधारेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा…निर्देशांकांची उच्चांकी दौड कायम; सेन्सेक्स त्रिशतकी खेळीसह विक्रमी ७७,३०१ अंशांवर

अर्थात यामुळे तुरीच्या किमती पूर्वीच्या पातळीवर, म्हणजे ७,००० ते ८,००० रुपये क्विंटलच्या कक्षेत येणे अशक्य आहे. एकतर उत्पादनात १५-२० टक्के वाढ होईल असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्ष हवामान अनुकूल राहिले नाही तर उत्पादनवाढ कमी राहील. तसेच नुकतीच येत्या खरीप पणन हंगामासाठी तुरीच्या हमीभावात क्विंटलमागे घसघशीत ५५० रुपयांची वाढ केल्याने नवीन हमीभाव ७,५५० रुपये झाला आहे. त्याच्या साधारण १०-१५ टक्के अधिक म्हणजे ८,४००-८,६०० या कक्षेत हे भाव येणे शक्य आहे. परंतु यासाठी सप्टेंबर – ऑक्टोबर उजाडेल असे वाटते आहे. तसेच सरकारने शेतकऱ्यांकडून १०० टक्के कडधान्य खरेदीची हमी दिल्याने किंमत अधिक घसरण्याला लगाम लागणार आहे. जर खरीप हंगामातदेखील कडधान्य उत्पादन चांगले राहिले तर पुढील वर्षात परिस्थिती सामान्य होऊन कडधान्य बाजाराला स्थैर्य प्राप्त होईल.