मुंबई : कैक वर्षांपासून अडगळीत लोटल्या गेलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांवर अचानक प्रकाशझोत आला असून, त्यांच्या समभागांनी कमावलेल्या बहुप्रसवा मोलाने एकंदर भांडवली बाजाराला दिशा देण्यात भूमिका बजावल्याचेही दिसून येत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, ‘सेन्सेक्स’च्या ६० हजारांवरून, ७० हजारांपर्यंतच्या प्रवासादरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात तब्बल दुपटीने झालेल्या वाढीची प्रमुख भूमिका राहिली आहे. हे बाजार भांडवल आता ४६.४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या या ‘मौल्यवान’ घोडदौडीत, भांडवली बाजारात नव्याने सूचिबद्ध झालेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) आणि इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी अर्थात ‘इरेडा’ या कंपन्यांचे ५.४१ लाख कोटींचे योगदान प्रमुख आहे.
बाजारात व्यवहार झालेल्या ५५१ सत्रांमध्ये ‘सेन्सेक्स’ने या १०,००० अंशांची कमाई केली आहे. एकूण बाजार भांडवलात सरकारी मालकीच्या कंपन्यांचा हिस्सा सुमारे १३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. केंद्र सरकारचा वाढीव भांडवली खर्च तसेच बँकिंग, विमा, संरक्षण क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि उत्पादन यांसारख्या क्षेत्रासाठी राबवलेल्या आर्थिक सुधारणांवरील गुंतवणूकदारांचा विश्वास प्रतिबिंबित करते.
हेही वाचा : परदेशी गुंतवणूकदारांच्या चौफेर खरेदीने सेन्सेक्स विक्रमी ७१ हजारांपुढे
बड्या उद्योगसमूहांचाही सहभाग
सप्टेंबर २०२१ मध्ये सेन्सेक्स ६०,००० टप्प्यांवर विराजनमान होता. खासगी क्षेत्रातील अदानी, रिलायन्स आणि टाटा समूहाने देखील ‘सेन्सेक्स’च्या मुसंडीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. टाटा समूहाचे एकंदर बाजार भांडवल २२.४८ लाख कोटींवरून, २७.४१ लाख कोटींवर पोहोचले आहे. रिलायन्स समूहाचे बाजार भांडवल १६.८७ लाख कोटींवरून, १८.६१ लाख कोटींवर, तर अदानी समूहाचे ९.७८ लाख कोटींवरून, १४.३७ लाख कोटींवर पोहोचले आहे.
हेही वाचा : अमेरिकेतील व्याजदर कपातीच्या संकेतातून ‘सेन्सेक्स-निफ्टी’ला विक्रमी उच्चांकी स्फुरण का?
गुंतवणूकदार ८ लाख कोटींनी श्रीमंत
मुंबई : भांडवली बाजारातील सलग तीन सत्रातील तेजीने गुंतवणूकदारांच्या पदरी ८.११ लाख कोटींची भर घातली आहे. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्र्हने व्याजदर अपरिवर्तित ठेवून पुढील वर्षी दर कपातीचे संकेत दिले आहेत, तसेच अविरत परदेशी निधीचा ओघ सुरू झाल्याने सर्वत्र तेजीमय वातावरण आहे. परिणामी मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजारभांडवल शुक्रवारी ३५७ लाख कोटी रुपयांच्या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचले.