हिंडेनबर्ग अहवालानंतर अदाणी ग्रुपचे शेअर्स चांगलेच कोसळले होते. त्या वेळी GQG Partners या गुंतवणूकदार कंपनीने समूहाच्या चार शेअर्समध्ये सुमारे १५,४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यावेळी GQG Partners सह-संस्थापक राजीव जैन यांच्या या निर्णयाला बरेच लोक ‘फेअर डील’ मानत नव्हते. पण ज्या विश्वासाने राजीव जैन यांनी अदाणी ग्रुपमध्ये गुंतवणूक केली होती, त्याचे त्यांना चांगले फळ मिळाले आहे. या गुंतवणुकीतून केवळ गेल्या १०० दिवसांत त्यांना ७६८३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. GQG च्या अदाणी शेअर्समधील गुंतवणुकीचे मूल्य आता २३,१२९ कोटी रुपये झाले आहे.
CnbcTV18 मधील वृत्तानुसार, राजीव जैन यांनी आता मॅक्स हेल्थकेअर या हॉस्पिटल चेन चालवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी भागीदारी केली आहे. सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर याबाबत एक विशेष माहिती समोर आली. GQG Partners ने मॅक्स हेल्थकेअरचे ७५.५ लाख शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत. NSE च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, GQG Partners Emerging Markets Equity Fund ने हे शेअर्स ५४९.७० रुपये प्रति शेअर या किमतीने खरेदी केले आहेत. या डीलची एकूण किंमत ४१५ कोटी रुपये आहे.
हेही वाचाः ‘या’ तारखेपर्यंत एक रुपयाही न भरता तुमचे आधार अपडेट करता येणार, कसा मिळवाल फायदा?
अदाणी शेअर्समध्ये ५० टक्के नफा
अदाणी समूहाच्या शेअर्सबाबत गुंतवणूकदार धास्तावले असताना राजीव जैन यांनी समूहाच्या ४ कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले होते. १०० दिवसांत राजीव जैन यांचे गुंतवणूक मूल्य ५० टक्क्यांनी वाढले. राजीव जैन यांच्या GQG पार्टनर्सने मार्चमध्ये अदाणी एंटरप्रायझेसमध्ये ५४६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. आता या गुंतवणुकीचे मूल्य ९०६० कोटी झाले आहे. अदाणी ग्रीनमध्ये गुंतवलेल्या २८०६ कोटी रुपयांचे बाजारमूल्य आता ५२३६ कोटी रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे अदाणी पोर्टमध्ये ५,२८२ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती, जी आता ६४८६ कोटी रुपये झाली आहे आणि अदाणी ट्रान्समिशनमध्ये १,८९८ कोटी रुपयांची गुंतवणूक आता २,३८४ कोटी रुपये झाली आहे.
हेही वाचाः पोस्ट ऑफिसमध्ये २००० रुपयांच्या नोटा बदलून मिळणार का? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती
कोण आहेत राजीव जैन?
राजीव जैन हे जवळपास सात वर्षे गुंतवणूक फर्म GQG पार्टनर्सचे सह संस्थापक आहेत. या कंपनीचा शेअर बाजारात झपाट्याने विस्तार होत आहे. राजीव जैन यांचा जन्म भारतात झाला. १९९० मध्ये मियामी विद्यापीठातून एमबीए करण्यासाठी ते अमेरिकेत गेले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजीव १९९४ मध्ये अॅसेट मॅनेजमेंट कंपनी व्होंटोबेलमध्ये रुजू झाले. २००२ मध्ये स्विस फर्ममध्ये सीईओ पदाची सूत्रे हाती घेतली. २३ वर्षांच्या अनुभवातूनच जैन यांनी २०१६ मध्ये GQG भागीदार सुरू केली. आज ते त्याचे अध्यक्ष आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत.