पंढरीच्या वारीला वारकरी दरवर्षी जात असतात. मोतीलाल ओसवालचे रामदेव अगरवाल दरवर्षी अमेरिका वारी करतात. त्यांना वॉरेन बफेच्या बर्कशायर हाथवे या कंपनीच्या वार्षिक सभेला उपस्थित राहायचे असते.
राम पिप्परिया यांच्या कार्यालयात १९८६ साली रामदेव अगरवाल यांची पहिल्यांदा भेट झाली. मोतीलाल ओसवाल आणि रामदेव अगरवाल एकत्र आले. त्यांनी कंपनीची स्थापना केली. या व्यवसायात फारच थोडे चार्टर्ड अकाउंटंट यशस्वी झालेले आहेत. कारण हा बाजार भल्याभल्यांना वेडावतो, त्यांचे वेड काढतो.
रायपूर येथे ५ एप्रिल १९५७ ला जन्म झालेले रामदेव अगरवाल १९८३ साली सीए झाले. सुनीता अगरवाल या त्यांच्या पत्नी होय. मुलगा वैभव अगरवाल फंड मॅनेजर, तसेच तेजी- मंदी या संस्थेचा संस्थापक. रामदेव अगरवाल यांना त्यांच्या मोठ्या भावाने शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी दहा लाख रुपये दिले. रामदेव अगरवाल यांनी हिरो होंडा या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली. ही गुंतवणूक वर्षानुवर्षे सांभाळल्यामुळे त्यांना भांडवलवृद्धी अतिशय मोठ्या प्रमाणात मिळाली. शेअर बाजारात संयमाने शेअर्स सांभाळले तर चांगली भांडवलवृद्धी मिळवता येते, या वॉरेन बफेच्या विचारसरणीचे यशस्वी पालन करून त्यांनी प्रचंड पैसा कमावला.
हेही वाचा – बाजाराचा तंत्र-कल : सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…
मोतीलाल ओसवाल आणि रामदेव अगरवाल या दोघांमध्ये कामाची विभागणी अतिशय चांगली आहे. मोतीलाल ओसवाल यांनी व्यवहाराच्या सर्व बाजू सांभाळायच्या आणि रामदेव अगरवाल यांनी गुंतवणूक संशोधन हा विभाग सांभाळायचा. दोघांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कारण कामाची विभागणी ही अशी व्यवस्थितपणे केलेली आहे. मूल्य विरुद्ध वृद्धी हा या बाजारातला कायमस्वरुपी संघर्ष असलेला वाद आहे. यात रामदेव मूल्यावर आधारित गुंतवणूक या विचारसरणीचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्या अगोदर चंद्रकांत संपत यांचे नाव प्रथम क्रमांकावर घ्यावे लागेल. या व्यक्तीने मूल्यावर आधारित गुंतवणूक करून चांगल्या प्रकारे पैसा कमावला.
रामदेव अगरवाल यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनविले आणि स्वतःसुद्धा अब्जाधीश झाले. त्यांची वैयक्तिक गुंतवणूक एवढी वाढली की त्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना स्वतंत्र माणूस नेमावा लागला. त्यांच्या गुंतवणुकीत महाराष्ट्र स्कूटर लिमिटेड या कंपनीचा समावेश होता. त्यांचा साहाय्यक त्यांना नेहमी असे सांगायचा की, “तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये महाराष्ट्र स्कूटर या कंपनीत केलेली गुंतवणूक फार किरकोळ आहे. हे तुमच्या प्रतिष्ठेला साजेसे नाही.” म्हणून त्यांनी हे शेअर्स विकले पाहिजेत, असाही त्याचा आग्रह होता. रामदेवजी मात्र, “आहे तर पडू द्या ! किरकोळ तर किरकोळ सांभाळण्याचा काय असा त्रास आहे?” अशा प्रकारे त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तीला हा शेअर विकू नका असे ते सांगायचे आणि पुढे या शेअरने त्यांना तुफान पैसा कमावून दिला. थोडक्यात शेअर बाजारात पैसा कमावण्यासाठी ज्ञान लागते आणि होय, नशीबसुद्धा लागते.
मोतीलाल ओसवाल ही कंपनी शेअर्स दलालीच्या क्षेत्रात चांगले यश मिळवत आहे. आणि त्यासाठी मोतीलाल ओसवाल आणि रामदेव अगरवाल यांचे नाते अतिशय घट्ट आहे. रामदेव अगरवाल यांनी संशोधन करून अनेक चांगले पण दुर्लक्षित शेअर आपल्या गुतवणूकदारांसाठी शोधून काढले आणि त्या शेअर्समध्ये चांगला पैसा कमावून दिला.
शेअर्स खरेदी-विक्रीच्या व्यवसायात भरपूर नफा कमावल्यानंतर गुतवणूकदारांची बदललेली गरज विचारात घेता त्यांनी म्युच्युअल फंड योजना गुंतवणूकयोग्य म्हणून सांगण्यास सुरुवात केली आणि आपल्या गुंतवणूकदारांना चांगला पैसा कमावून दिला. यश आणि अपयश एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बाजारात हळूहळू म्युच्युअल फंडाचे वर्चस्व वाढेल. म्युच्युअल फंड्स हे उद्याच्या काळाची गरज आहेत. योग्यवेळी म्युच्युअल फंडाची सुरुवात करणे त्यांना चांगले ठरले.
हेही वाचा – माझा पोर्टफोलियो- वाहनपूरक उत्पादनांच्या बहरत्या मागणीची लाभार्थी
पुढे काय? हा प्रश्न या व्यवसायातल्या प्रत्येकाला सतावत असतो. यामुळे शेअर बाजारात काय बदल घडतील हे पाहून, तंत्रज्ञानाचा चांगला पाठिंबा विचारात घेऊन म्युच्युअल फंडाची वाढ करणे, हे उद्दिष्ट रामदेव अगरवाल यांना ठेवावे लागेल. व्यवसायातील स्पर्धा तीव्र होत जाणार आहे. शेअर दलाली कमी कमी होत जाईल. असे होत असताना गुतवणूकदारांचे हित कशात आहे, याचा विचार करून गुतवणूकदारांना भांडवलवृद्धी निर्माण करण्यासाठी, मदत करण्यासाठी अग्रेसर राहणे हे काम दोघांना करावे लागेल. काही वर्षांपूर्वी दि मराठा या हॉटेलमध्ये रामदेव अगरवाल यांच्या मित्राच्या मुलाचे लग्न असल्याने ते उपस्थित होते, त्यावेळेस अत्यंत मोकळेपणाने गप्पागोष्टी झाल्या. नाशिकला अनेक वेळा त्यांना ऐकण्याची संधी मिळाली. याअगोदर म्युच्युअल फंडाचा व्यवसाय ही कंपनी फार काळ करणार नाही, विकून मोकळे होतील असे वाटायचे. परंतु आम्हाला म्युच्युअल फंड वाढवायचा आहे. विक्री करायची नाही. या मुद्द्यावर मोतीलाल ओसवाल आणि रामदेव अगरवाल ठाम आहेत. काही कंपन्यांच्या बाबतीत खरेदीचे सल्ले चुकलेले असले तरी एकूण सर्व घटक विचारात घेता शेअर बाजारातील ही जोडी दीर्घकालीन यश संपादन करेल अशी आशा आहे.