Morgan Stanley Reliance: गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात मंदी दिसून येत असून, अनेक बड्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरल्याचे पाहायला मिळत आहे. अशात आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरमध्ये आणखी ३० टक्क्यांनी वाढ होईल अशी शक्यता वर्तवली आहे. यानंतर गुरुवारी, २० फेब्रुवारी रोजी निफ्टी ५० निर्देशांकातील बलाढ्य कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरमध्ये जवळपास १ टक्के वाढ झाली. कंपनीचा शेअर ट्रेडिंग दरम्यान १% पेक्षा जास्त वाढून १२३९.४० रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला होता.
टारगेट प्राइज १,६०६ रुपये निश्चित
दरम्यान मॉर्गन स्टॅनलीने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रति शेअरची टारगेट प्राइज १,६०६ रुपये निश्चित केली आहे, जी बुधवारच्या १,२२६ रुपयांच्या क्लोजिंग प्राइजपेक्षा ३० टक्के जास्त आहे. शिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज कव्हर करणाऱ्या ३८ विश्लेषकांपैकी ३४ जणांनी ‘खरेदी’ (Buy) रेटिंग दिले आहे, तर तिघांनी ‘विक्री’ (Sell) रेटिंग दिले आहे, तर उर्वरित विश्लेषकांनी ‘होल्ड’ रेटिंग दिले आहे.
काय आहे मॉर्गन स्टॅनलीचे मत?
मॉर्गन स्टॅनलीने त्यांच्या नोटमध्ये म्हटले आहे की, “रिलायन्स इंडस्ट्रीजने सुमारे ४०० दशलक्ष डॉलर्सच्या १० गिगावॅट क्षमतेच्या बॅटरी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारसोबत करार केला आहे. दरम्यान या कारारावर रिलायन्स गेल्या वर्षापासून काम करत आहे, परंतु ही घोषणा केल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नवीन ऊर्जा योजनेच्या अंमलबजावणीवर काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतात विकसित झालेल्या नवीन ऊर्जा पुरवठा साखळीसाठी देशांतर्गत उत्पादन साध्य करण्याच्या सरकारच्या उपक्रमाचा हा करार एक भाग आहे.” याबाबत सीनएबीसी टीव्ही १८ ने वृत्त दिले आहे.
रिलायन्सच्या शेअर्समध्ये तेजी
दरम्यान मॉर्गन स्टॅनलीने रिलायन्सच्या शेअरमध्ये आणखी ३० टक्के वाढ होण्याची क्षमता असल्याचे म्हटल्यानंर, २० फेब्रुवारी रोजी दिवसभरात रिलायन्सच्या शेअरच्या किमतीत १ टक्क्यांची वाढ झाली आहे. बीएसईवर त्याची किंमत १२३९.४० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. बाजार बंद झाला तेव्हा, रिलायन्सचा शेअर ०.५० टक्क्यांच्या वाढीसह १२३३.०५ रुपयांवर स्थिरावला. कंपनीचे मार्केट कॅप १६.६८ लाख कोटी रुपये आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. दरम्यान गेल्या एका वर्षात कंपनीचे शेअर्स १६ टक्क्यांनी घसरले आहेत.