मुंबई : जागतिक बाजारात सकारात्मक कल असूनही गुंतवणूकदारांनी बँकिंग, वित्त आणि ग्राहकोपयोगी वस्तू समभागांमध्ये केलेला विक्रीचा मारा, या परिणामी तीन सत्रांतील तेजीपासून फारकत घेत शुक्रवारी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक ओसरले. सकाळच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी शिखरावर पोहोचल्यानंतर, गुंतवणूकदारांनी काही समभागांमध्ये नफावसुलीला सुरुवात केली.
सप्ताहअखेर शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २१०.४५ अंशांच्या घसरणीसह ७९,०३२.७३ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात, तो ४२८.४ अंशांनी वधारून ७९,६७१.५८ या नवीन विक्रमी शिखरावर पोहोचला होता. दुसरीकडे निफ्टीने ३३.९० अंश गमावले आणि तो २४,०१०.६० पातळीवर बंद झाला. दिवसभरात, त्याने २४,१७४ या सार्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. मात्र प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ७९,००० अंश आणि निफ्टी २४,००० अंशांच्या पातळीवर कायम आहेत. गेल्या चार सत्रांत सेन्सेक्सने २,०३३.२८ अंश म्हणजेच २.६३ टक्क्यांनी उसळी घेतली.
हेही वाचा >>>दरवाढीचे सत्र ; एअरटेलपाठोपाठ व्होडा-आयडियाकडूनही मोबाइल दरांमध्ये १०-२१ टक्क्यांनी वाढ
आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतचा आशावाद आणि सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) अंदाजात सुधारणा यामुळे भांडवली बाजारात गती कायम आहे. परदेशी गुंतवणूकदारांच्या पुनरागमनामुळे बाजारात उत्साह संचारला असून त्यांनी लार्जकॅप कंपन्यांच्या समभाग खरेदीला प्राधान्य दिले आहे. मात्र, सप्ताहअखेर वित्तीय क्षेत्रात विशेषतः खासगी बँकांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, कोटक महिंद्र बँक, मारुती, जेएसडब्ल्यू स्टील आणि बजाज फिनसर्व्ह या कंपन्यांच्या समभागात घसरण झाली. तर रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, नेस्ले आणि टायटन यांचे समभाग तेजीत होते. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गुरुवारी ७,६५८.७७ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.
हेही वाचा >>>वित्तीय तूट ३ टक्क्यांवर; महालेखापालांची माहिती, चालू आर्थिक वर्षातील मेअखेरची स्थिती
रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल २१ लाख कोटींवर
भांडवली बाजारातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार भांडवलाने २१ लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडला आहे.शुक्रवारच्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाने ३,१६२ कोटी रुपये ही ५२ आठवड्यातील ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली. दिवसअखेर समभाग २.२८ टक्क्यांनी वधारून ३,१३०.८० रुपयांवर स्थिरावला. परिणामी कंपनीच्या बाजार भांडवलात शुक्रवारच्या सत्रात ४७,७७७.५७ कोटी रुपयांची भर पडून ते २१,१८,३०५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वात मूल्यवान बनली आहे.रिलायन्सने विद्यमान वर्षातील १३ फेब्रुवारी रोजी २० लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा गाठला होता. या वर्षी आतापर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांनी २१.१६ टक्क्यांनी उसळी घेतली आहे.
सेन्सेक्स ७९,०३२.७३ -२१०.४५ (-०.२७%)
निफ्टी २४,०१०.६० -३३.९० (-०.१४%)
डॉलर ८३.३८ -७ पैसे
तेल ८७.१६ ०.७२