Reliance Shares: अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी ८ जुलै २०२४ रोजी बीएसईवर १,६०८.९५ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. तेव्हापासून आतापर्यंत रिलायन्सचे शेअर्स मंदीच्या दबावाखाली आहेत. त्यांच्या शेअर्सच्या किमतीत उच्चांकापासून २५% घट झाली आहे. किरकोळ मंदी आणि कमकुवत रिफायनिंग मार्जिन दरम्यान परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ब्लूचिप स्टॉक विकल्यामुळे गुंतवणूकदारांचे ५.४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जानेवारी २०२४ पासून रिलायन्सची कामगिरी निफ्टीपेक्षा १०% कमी राहिली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये निराशा आहे.

दरम्यान, गेल्या दोन ट्रेडिंग सेशन्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये ४% वाढ झाली आहे. ज्यामुळे आशेचा एक किरण निर्माण झाला आहे. गुरुवारी (६ मार्च) रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सना जोरदार मागणी दिसून आली होती. बीएसईवर रिलायन्सच्या शेअर्समध्ये २.१५ टक्क्यांनी वाढ झाली आणि त्यांनी दिवसाची १,२०१.०५ रुपये प्रति शेअरची उच्चांक पातळी गाठली होती. बुधवारी रिलायन्सचे शेअर्स प्रति शेअर १,१७५ रुपयांवर बंद झाले. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने केलेल्या अपग्रेडनंतर रिलायन्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

बाय रेटिंग

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने रिलायन्सच्या शेअर्सवरील त्यांचे रेटिंग ‘ADD’ वरून ‘BUY’ असे अपग्रेड केले आहे. पण, ब्रोकरेजने शेअर्सची फेअर व्हॅल्यू १,४३५ रुपयांवरून १,४०० रुपयांपर्यंत किंचित कमी केली आहे. त्यामुळे भविष्यात रिलायन्सचा शेअर्स २०% पर्यंत वाढ दर्शवू शकतो. याबाबत बिझनेस स्टँडर्डने वृत्त दिले आहे.

ब्रोकरेजने काय म्हटले?

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या विश्लेषकांनी नोंदवले की, “गेल्या १२ महिन्यांत रिलायन्सच्या शेअर्समध्ये २२ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे या मोठे करेक्शन झाले आहे. कंपनीच्या कमकुवत कामगिरीमागील मुख्य कारण रिटेल विभागाची कमकुवत कामगिरी होती.”

रिलायन्सचे शेअर्स ३६% परतावा देऊ शकतात

दुसरीकडे, जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने देखील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सवरील त्यांचे BUY रेटिंग कायम ठेवले आहे. ब्रोकरेजने या स्टॉकची टार्गेट प्राइज १६०० रुपये ठेवली आहे. त्यामुळे भविष्यात रिलायन्सचे शेअर्स ३६% परतावा देऊ शकतात.

रिलायन्सच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा डिसेंबर तिमाहीत निव्वळ नफा ७.४ टक्क्यांनी वाढून १८,५४० कोटी रुपये झाला. ऊर्जा, रिटेल व्यवसाय आणि डिजिटल सेवा क्षेत्रातील चांगल्या कामगिरीमुळे कंपनीच्या नफ्याला पाठबळ मिळाले. याशिवाय, ऑक्टोबर-डिसेंबर २०२५ या तिमाहीत आरआयएलचा कामकाजातून मिळणारा महसूल २.४३ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

Story img Loader