टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही टाटा समूहाचा एक महत्त्वाची मोठी कंपनी आहे. टीसीएस गेली ५० वर्षांहून अधिक काळ माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी सेवा, सॉफ्टवेअर सल्लागार आणि संबंधित व्यवसायात सोल्यूशन्स देणारी आघाडीची कंपनी आहे. कंपनी प्रामुख्याने पांच व्यवसाय क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे – यांत बँकिंग, वित्त सेवा आणि विमा (बीएफएसआय) ज्याचा महसुलात ३९ टक्के वाटा असून, किरकोळ आणि ग्राहक व्यवसाय (१७ टक्के), दळणवळण, मीडिया आणि तंत्रज्ञान (१६ टक्के) , मॅन्युफॅक्चरिंग (११ टक्के) आणि इतर प्लॅटफॉर्म (१७ टक्के) यांचा समावेश होतो.
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील असंख्य सेवांसाठी कंपनीकडे प्लॅटफॉर्मची श्रेणी आहे यामध्ये बीएफएसआयखेरीज शैक्षणिक संस्थांसाठी व्हर्च्युअल लर्निंग प्लॅटफॉर्म, औषध विकास आणि क्लिनिकल चाचण्यांच्या डिजिटल परिवर्तनासाठी व्यासपीठ, सबस्क्रिप्शन आधारित सेवांसाठी प्लग अँड प्ले बिझनेस प्लॅटफॉर्म, एंटरप्राइझ निर्णयांना उत्तेजित आणि ऑप्टिमाइझ करण्यात मदत करण्यासाठी आर्टिफिश्यल इंटेलीजन्स समर्थित प्रणाली इ. अनेक सेवांचा समावेश होतो.
ब्रॅण्ड मूल्य
ग्राहक-केंद्रितता, गुणवत्ता आणि अंमलबजावणी उत्कृष्टतेसाठी टाटा समूहाची प्रतिष्ठा असल्यामुळे टीसीएस जगभरातील आघाडीच्या कॉर्पोरेशन्ससाठी पसंतीची भागीदार बनली आहे. अलीकडच्या वर्षांत कंपनीने आपली उपस्थिती लक्षणीयरीत्या निर्माण केली आहे आणि सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये आपला ब्रँड मजबूत केला आहे. उत्तर अमेरिका, युरोप, युके, भारत, लॅटिन अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया, इतरांसह ते कार्यरत असलेल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये टीसीएस उच्च क्रमांकाचा ब्रँड म्हणून ओळखला जातो. टीसीएसचे ब्रँड मूल्य १६.७९ अब्ज डॉलर आहे.
टीसीएस एकूण महसुलाच्या सुमारे ५२ टक्के हिस्सा अमेरिकी ग्राहकांमधून मिळविते, त्यानंतर युरोप (३१ टक्के), भारत (६ टक्के) आणि उर्वरित जगापासून ११ टक्के महसूल मिळविते. कंपनीच्या ग्राहकांच्या मांदियाळीत गूगल, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट अझुर, इंटेल, बॉश, आयबीएम, ॲपल, ओरॅकल, ॲडोब यांसारख्या जगातील काही मोठ्या समूहांना सेवा देते. संशोधन आणि नवोन्मेष हे कंपनीच्या वाढ आणि परिवर्तनाच्या दृष्टिकोनाशी दृढपणे जुळलेले आहे. ‘आरएफआयडी टॅग’ ते इंजिनीरिंग सोल्युशन्सपर्यंत कंपनीकडे अनेक पेटंट्स असून कंपनीचे संशोधन कार्य अविरत चालू आहे. तिच्या ‘इनोव्हेशन लॅब’ भारतात आणि जगभरात सर्वत्र आहेत.
डिसेंबर २०२२ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने उलाढालीत १९ टक्के वाढ साध्य करून ती ५८,२२९ कोटी रुपयांवर नेली आहे, तर नक्त नफ्यात ११ टक्के वाढ होऊन तो १०,८४६ कोटींवर गेला आहे. काही दिवसांपूर्वी सीईओ राजेश गोपीनाथन यांनी अचानक राजीनामा दिल्याने टीसीएसच्या शेअरचा भाव थोडा खाली आला आहे. मात्र नवीन नियुक्त झालेले अनुभवी के. क्रिथिवासन आणि टीसीएसची जागतिक बाजारपेठेतील पत पाहता सध्या ३,१०० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर प्रत्येक मंदीत खरेदी करण्यासारखा आहे. टीसीएससारखा शेअर तुमच्या पोर्टफोलियोला स्थैर्य देऊ शकेल.
सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (बीएसई कोड ५३२५४०)
प्रवर्तक: टाटा समूह
बाजारभाव: रु. ३,११७ /-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: माहिती-तंत्रज्ञान / सॉफ्टवेअर
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ३६५.९१ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७२.३०
परदेशी गुंतवणूकदार १२.९४
बँक/ म्यूचुअल फंडस्/ सरकार ९.३०
इतर/ जनता ५.४६
पुस्तकी मूल्य: रु.२६६/- `
दर्शनी मूल्य: रु. १/-
लाभांश: ४३०० %
प्रति समभाग उत्पन्न: रु. १११.१८
किंमत उत्पन्न गुणोत्तर: २८
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २५.६
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०८
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ७४
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड: ५४.९
बीटा : १
बाजार भांडवल: रु. ११,४०,५२६ कोटी (लार्ज कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ३,८३६ / २,९३६
-अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com