मुंबई: स्थानिक भांडवली बाजारातील परदेशी गुंतवणूक वेगाने माघारी घेतली जात असल्याचा रुपयाच्या विनिमय मूल्याला फटका बसत असून, सोमवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाने आणखी चार पैशांच्या घसरणीसह ८४.११ या विक्रमी नीचांकी पातळीवर लोळण घेतली.
एकीकडे परकीय गुंतवणूकदार बाजारात गुंतलेला पैसा वेगाने काढून घेत तो डॉलररूपाने माघारी नेत आहेत, तर दुसरीकडे खनिज तेलाच्या स्थिरावलेल्या किमतीही वाढत जात, पिंपामागे ७५ डॉलरवर तापल्या आहेत. परिणामी तेल आयातदारांकडूनही वाढलेल्या डॉलरच्या मागणीने रुपयाच्या मूल्यावर ताण आणला, असे चलन बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
आंतरबँक परकीय चलन व्यवहारात, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ८४.०७ या पातळीवर खुला झाला. सत्रादरम्यान, स्थानिक चलनाचे मूल्य ८४.०६ च्या उच्च आणि ८४.१२ च्या निम्न स्तरादरम्यान फिरत राहिले. अखेरीस चार पैशांच्या तोट्यासह ते ८४.११ या सार्वकालिक नीचांकावर ते स्थिरावले.
हेही वाचा >>>सेन्सेक्सची मोठी आपटी! निफ्टी २४ हजारांखाली, अमेरिकेतील राजकीय अनिश्चिततेचा परिणाम
ट्रम्प यांचा विजय रुपयासाठी घातकी
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभाव्य विजयातून अमेरिकी डॉलर मजबूत होऊ शकतो, असा ‘बार्कलेज’ या जागतिक दलाली पेढीचा अहवाल आहे. अमेरिकी डॉलरची मजबुती अर्थात रुपया आणखी कमकुवत होण्याच्या या परिणामाच्या शक्यतेकडे रिझर्व्ह बँकेची बारीक नजर असेल. शिवाय येत्या बुधवारी, गुरुवारी अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हची संभाव्य व्याजदर कपातीची बैठक नियोजित आहे. व्याजदर कपातीच्या सुरू झालेल्या चक्राचे भवितव्य निश्चित करणाऱ्या या बैठकीच्या निर्णयाबाबत बाजारात औत्सुक्य आहे.
एकंदर बाह्य प्रतिकूलतेमुळे रुपयाच्या मूल्याबाबत नकारात्मक व्यापाराचा कल पुढील काही दिवस कायम राहण्याची अपेक्षा आहे. यातून प्रति डॉलर ८३.९५ ते ८४.३० या श्रेणीत रुपयाच्या किमतीचे हेलकावे अनुभवास येऊ शकतील.- अनुज चौधरी, संशोधन विश्लेषक, बीएनपी परिबा शेअरखान