Sensex Today Marathi News: ऐन दिवाळीत भारतीय शेअर बाजारानं गुंतवणूकदारांच्या छातीत धडकी भरवली आहे. गेल्या आठवड्याभरापासून शेअर बाजार सातत्याने खाली जात असल्याने भागधारकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. गेल्या तीन महिन्यांमधला हा सेन्सेक्सचा नीचांकी आकडा असून त्याचा परिणाम इतर व्यवहारांवर होण्याचीही शक्यता आहे. मात्र, शेअर बाजारात आत्ता जरी काहीसं नकारात्मक चित्र असलं, तरी गेल्या वर्षभरात शेअर बाजारानं गुंतवणूकदारांना घसघशीत नफा कमवून दिला आहे. नफ्याचा हा आकडा थोडाथोडका नसून तब्बल दीड लाख कोटींच्या घरात असल्याचं दिसून आलं आहे.
संवत वर्षपूर्ती आणि सेन्सेक्सची कामगिरी
नुकतंच संवत वर्ष २०८० पूर्ण झालं. मुंबई शेअर बाजारात या वर्षाचा शेवट नकारात्मक वातावरणाने झाला. सेन्सेक्स गुरुवारी ५५३ अंकांनी घसरून ७९,३८९ पर्यंत खाली आला. गेल्या तीन महिन्यांमधील ही सेन्सेक्सची नीचांकी कामगिरी आहे. दुसरीकडे नॅशन स्टॉक एक्स्चेंजमध्ये निफ्टीही १३६ अंकांची घसरण नोंदवत २४,२०५ वर स्थिरावला.
या वर्षाच्या शेवटी विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर भागविक्री केल्यामुळे मुंबई शेअर बाजारातील अग्रगण्य गुंतवणूकदारांच्या एकूण मूल्यामध्ये ६ टक्क्यांची घट झाली. पण गेल्या दिवाळीपासून शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या दिवाळीपासून अर्थात यंदाच्या संवत वर्षाच्या प्रारंभापासून भारतातील गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुंतवलेल्या एकूण मूल्यामध्ये १२८ लाख कोटींची भर पडली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी १२ नोव्हेंबरपासून शेअर बाजारानं वर्षभरात ४५३ लाख कोटींपर्यंत मजल मारली आहे. ही कोणत्याही संवत वर्षातली सर्वात मोठी मूल्यवाढ ठरली आहे.
शेअर बाजारातली वाढ कशामुळे?
मुंबई शेअर बाजारात दिसून आलेल्या वर्षभरातल्या या सकारात्मक वृद्धीमागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात केंद्रात स्थिर सरकार, आंतरराष्ट्रीय घटकांचा भारतीय बाजारपेठेवर होणारा परिणाम रोखण्यात आलेलं यश, सूक्ष्म वित्तनियोजन व देशांतर्गत बाजारपेठेतून उभी राहिलेली विक्रमी गुंतवणूक कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे.
जागतिक नरमाईने ‘सेन्सेक्स’ची ४ शतकी घसरण
मुंबई शेअर बाजारात गुंतवणूकदारांची चिंता वाढली
दरम्यान, मुंबई शेअर बाजारात यंदाच्या दिवाळसणामध्ये गुंतवणूकदारांसाठी फारशी सकारात्मक परिस्थिती दिसत नसून गेल्या आठवड्याभरावापासून सेन्सेक्स व निफ्टीनं सातत्याने घसरणच नोंदवली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसमोर बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत.