लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : एसबीआय म्युच्युअल फंडाने वाहन उद्योगाशी संबंधित कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करणाऱ्या ‘एसबीआय ऑटोमोटिव्ह अपॉर्च्युनिटीज फंडा’ची घोषणा केली आहे. हा गुंतवणुकीस कायम खुला असणारा आणि सक्रिय व्यवस्थापित फंड असून, तो १६ ते ३१ मे दरम्यान (एनएफओ) प्रारंभिक गुंतवणुकीस खुला राहिल. या फंडासाठी ‘निफ्टी ऑटो टीआरआय’ हा मानदंड निर्देशांक निश्चित करण्यात आला आहे. उल्लेखनीय म्हणजे या निर्देशांकाने मागील १० वर्षात २६६ टक्के तर गत पाच वर्षात १८३ टक्क्यांची वाढ दर्शविली आहे. फंडातून प्रामुख्याने मालमत्तेपैकी ८० ते १०० टक्के गुंतवणूक वाहन निर्मिती आणि वाहन-पूरक व्यवसायाशी निगडीत गुंतवणूक केली जाईल. या फंडाला एकूण मालमत्तेपैकी ३५ टक्के मालमत्ता वाहन उद्योगाशी संबंधित एडीआर, जीडीआर आणि परदेशी बाजारात नोंदलेल्या कंपन्यांत गुंतवणूक करण्यास ‘सेबी’ने मान्यता दिली आहे. या फंडासाठी समर्पित निधी व्यवस्थापक म्हणून तन्मय देसाई आणि प्रदीप केसवन (परदेशी गुंतवणूक) यांची फंड घराण्याने नेमणूक केली आहे.
जगातील तिसरी मोठी वाहनांची बाजारपेठ म्हणून भारताचे स्थान असून, देशांतर्गत उच्च दोन अंकी दरातील मागणीसह, विदेशातील निर्यातीतही भारतीय वाहन निर्मात्यांनी कामगिरी सुधारत चालली आहे. बरोबरीने वाहनांचे सुटे घटक आणि पूरक सामग्रीच्या उत्पादन परिसंस्थेचे एकूण वाहन उद्योगाच्या वाढीत जवळपास ३० टक्के योगदान आहे, त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांना संपत्ती निर्मितीचे हे क्षेत्र मुबलक संधी प्रदान करते.