नवी दिल्ली : अदानी समूहाच्या सहा कंपन्यांना संबंधित पक्ष व्यवहारांचे उल्लंघन आणि सूचिबद्धते संबंधी नियमांचे पालन न केल्याप्रकरणी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात ‘सेबी’कडून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
समूहातील सहा कंपन्यांमध्ये अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी पॉवर, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी टोटल गॅस आणि अदानी विल्मार या कंपन्यांचा समावेश आहे. कंपनीने मार्चअखेर तिमाही आणि सरलेल्या आर्थिक वर्षाची आर्थिक कामगिरी जाहीर केली होती, त्यावेळी अहवालातून माहिती उघड झाली.
हेही वाचा…‘सेन्सेक्स’ला ७०० अंशांची झळ; ‘निफ्टी’ विक्रमी पातळीपासून माघारी
बाजार विश्लेषक आणि कायदेतज्ज्ञांच्या मते, सेबीकडून करण्यात आलेले आरोप फारसे गंभीर स्वरूपाचे नाहीत. त्यामुळे समभागांवर त्यांचा फारसा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. नियमांचे उल्लंघन केल्याने त्यावर सेबीकडून किमान दंड आकारला जाऊ शकतो. शिवाय सेबीच्या कारणे दाखवा नोटिशीमुळे कंपन्या दोषी ठरत नाही. कारण ती केवळ कायदेशीर सूचना असते. नियामक कंपनीच्या प्रतिसादाने समाधानी झाल्यास, प्रकरण सामान्यतः तेथेच संपते. समाधानी न झाल्यास मात्र सेबीकडून दंड आकारणी केली जाते.
हेही वाचा…इंडेजीनचा ‘आयपीओ’ ६ मेपासून गुंतवणुकीस खुला
समभागात किरकोळ घसरण
अदानी एंटरप्रायझेसचा समभाग १.५२ टक्क्यांच्या घसरणीसह २९९३.२५ रुपयांवर बंद झाला. अदानी पोर्ट्स आणि अदानी टोटल गॅस (एटीजीएल) प्रत्येकी १.३८ आणि ०.१९ टक्क्यांनी घसरले, तर अदानी विल्मरचे समभाग २.०५ टक्क्यांनी घसरले. तर अदानी एनर्जी सोल्युशन्स ०.८३ टक्के वाढीसह बंद झाला.