पद्मभूषण जसपाल भट्टी वर्ष २०१२ मध्ये एका अपघातात वारले. पण त्यांनी त्यांच्या कार्यक्रमातून जी संकल्पना वापरली, ती जवळपास तशीच संकल्पना या घोटाळ्यात वापरली गेली. १० मे २०२४ रोजी भांडवली बाजार नियामक सेबीने एक घोटाळा उघडकीस आणला आणि एक अंतरिम आदेश पारित केला. आदेशानुसार वेरेनियम क्लाऊड लिमिटेड आणि हर्षवर्धन साबळे यांच्यावर अनेक बंधने आणली. पुढील लेख वाचण्यापूर्वी गूगलवर जाऊन जसपाल भट्टी गोलगप्पे किंवा पाणी-पुरी कंपनी असे लिहून ६ मिनिटांचा व्हिडीओ बघा. हा घोटाळा वाचताना अक्षरशः पदोपदी त्याची आठवण येते. अर्थात गेल्या ३० वर्षांपासून घोटाळेबाजांची हीच कार्यपद्धती असावी.
असो, आता नेमका घोटाळा काय ते बघू या, काही वृत्तपत्र, समाजमाध्यमे आणि इतर माध्यमांतूनही तक्रारी मिळाल्यावर सेबी आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने कंपनी आणि त्याच्या प्रवर्तकांची चौकशी सुरू केली. २७ सप्टेंबर २०२२ ला वेरेनियम राष्ट्रीय शेअर बाजारातील लघु आणि मध्यम व्यासपीठावर सूचिबद्ध झाला. त्यावेळेला त्याच्या उद्योग ब्लॉकचेन, डिजिटल ऑडिओ, व्हिडीओ, विदा केंद्र उभे करणे इत्यादी दाखवण्यात आला होता. आयपीओच्या माध्यमातून कंपनीने सुमारे ४० कोटी रुपये जमा केले. ३० सप्टेंबर २०२३ ला आपल्या सेबीला दाखल केलेल्या विवरणात, सुमारे २८ कोटी रुपये वरील कारणांसाठी वापरलेलेसुद्धा दाखवण्यात आले होते. घोटाळा उघडकीस यायला सुरुवात झाली, ती कंपनीच्या एका घोषणेने. ज्यात कंपनीने आपल्या प्रवर्तकांचे समभाग कमी झाल्याचे जाहीर केले आणि बाजाराला आधी दिलेल्या माहितीत चूक झाल्याचे मान्य केले. त्या घोषणेत त्यांनी २९ जानेवारी २०२४ पर्यंत पुढील माहिती देण्याचेसुद्धा मान्य केले. सेबीच्या आदेशात म्हटल्याप्रमाणे आदेश पारित करेपर्यंत ही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे सेबीने चौकशी सुरू केली आणि त्याची व्याप्तीसुद्धा वाढवली. यामध्ये प्रारंभिक सूचिबद्धतेमधून मिळालेल्या निधीच्या वापराची चौकशीसुद्धा होती आणि ताळेबंदाची सत्यतासुद्धा तपासण्यात येणार होती. तपासकर्त्यांनी या कंपनीशी संबंधित असणाऱ्या कित्येक कंपन्यांची तपासणी केली आणि मोठ्या रकमांच्या व्यवहारांची माहिती आदेशात दिली आहे.
हेही वाचा…बाजार रंग- परदेशी गुंतवणुकीची घरवापसी?
तपासकर्त्यांनी पहिले लक्ष केंद्रित केले ते २८ कोटी रुपयांवर. ते नक्की कसे आणि कुणाला दिले. जेव्हा त्याची कागदपत्रे मागितली तेव्हा कंपनीकडून धक्कादायक उत्तर आले की, कागदपत्रे जीएसटी ऑडिटसाठी देण्यात आली आहेत आणि त्यामुळे ती देऊ शकत नाहीत. यात अवान्स टेक्नॉलॉजी या कंपनीचे नाव पुढे आले आणि त्यात काही अनियमितता बघण्यात आली. त्यापूर्वी वेरेनियमने एक कंपनी टर्मरिक लाइफस्टाइलमध्येसुद्धा दीड कोटींची गुंतवणूक केली होती. ही गुंतवणूक आर्थिक मालमत्ता म्हणून ताळेबंदात दाखवण्यात आली होती पण तपासकर्त्यांना जे उत्तर दिले त्यात त्याला हातउसने म्हणजे ॲडव्हान्स म्हणून संबोधण्यात आले, जी एक अनियमितता होती. मुख्य म्हणजे आदेशात चक्क या कंपनीचे इंस्टाग्राम हॅन्डल दाखवण्यात आले असून दोन्ही उद्योग कसे एकमेकांना अजिबात पूरक नसूनसुद्धा गुंतवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अजूनही बरेच काही असे घडले आहे, ते आपण पुढील भागात बघू या
ashishpthatte@gmail.com
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत.