मुंबई: निर्देशांकातील सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधील दमदार खरेदीने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीला बुधवारी पुन्हा नवीन उच्चांकावर पोहोचवले. आशियाई भांडवली बाजारांमधील सकारात्मकतेने देशांतर्गत आघाडीवर उत्साह संचारला.

बुधवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६२०.७३ अंशांनी वधारून ७८,६७४.२५ या नवीन शिखरावर स्थिरावला. दिवसभरात, तो ७०५.८८ अंशांनी वधारून ७८,७५९.४० या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १४७.५० अंशांची भर पडली आणि तो २३,८६८.८० या विक्रमी बंद शिखरावर स्थिरावला. बुधवारच्या सत्रात त्याने २३,८८९.९० या सार्वकालिक उच्चांकाला स्पर्श केला. मंगळवारच्या सत्रात दोन्ही निर्देशांकांनी त्यांच्या तोवरच्या उच्चांकी पातळ्यांना ओलांडणारी कामगिरी केली होती.

हेही वाचा : ते आले, त्यांनी पाहिलं, त्यांनी जिंकलं

लार्जकॅप कंपन्यांच्या समभागांमधील तेजीच्या जोरावर देशांतर्गत भांडवली बाजाराने सलग दुसऱ्या सत्रात नवीन शिखर गाठले. गेल्या काही सत्रांतील तेजीमध्ये लार्जकॅप कंपन्यांचे समभागांची कामगिरी फारशी उठावदार नव्हती, त्यामुळे त्यांचे सध्याचे मूल्यांकन योग्य पातळीवर आहे. या उलट, मिड आणि स्मॉल-कॅप कंपन्यांच्या समभागांमधील वाढलेल्या मूल्यांकनाच्या चिंतेमुळे त्यात सध्या नफावसुली सुरू आहे. कंपन्यांचे मजबूत आर्थिक ताळेबंद, सकल राष्ट्रीय उत्पादनातील समाधानकारक वाढ आणि कमी होणाऱ्या महागाईमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, अदानी पोर्ट्स, ॲक्सिस बँक, एनटीपीसी आणि बजाज फायनान्स या कंपन्यांचे समभाग तेजीत होते. तर महिंद्र अँड महिंद्र, टाटा स्टील, टेक महिंद्र आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या समभागात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मंगळवारी १,१७५.९० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.

हेही वाचा : वित्तरंजन : नीतिमत्ता वेशीवर टांगणारा – राज राजरत्नम

रिलायन्सची उच्चांकी झेप

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाने बुधवारच्या सत्रात ४ टक्क्यांची उसळी घेत ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी गाठली. परिणामी, कंपनीच्या बाजार भांडवलात एका सत्रात ८०,३५९.४८ कोटी रुपयांची भर पडली आणि ते २०.४८ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले. दिवसअखेर समभाग ४.०९ टक्क्यांनी वाढून ३,०२७.४० रुपयांवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ३,०३७ रुपयांच्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला होता.

सेन्सेक्स ७८,६७४.२५ ६२०.७३ (०.८०%)
निफ्टी २३,८६८.८० १४७.५० (०.६२%)
डॉलर ८३.६० १७
तेल ८५.६९ -०.८०