भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने ७२ हजारांच्या दिशेने झेप घेतली आहे. तर निफ्टी निर्देशांकातही आज २१ हजाराहून अधिकची वाढ झालेली पाहायला मिळाली. सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांची ताजी दौड पाहता भांडवली बाजारात गुंतवणूकदारांमध्ये सेन्सेक्स एक लाखाची पातळी गाठणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मध्यम वर्गीय गुंतवणूकदारांना बाजारातील मिड कॅप आणि स्माल कॅप निर्देशांकातील समभाग गुंतवणुकीसाठी नेहमीच खुणावत आले आहेत. कमी गुंतवणुकीत चांगला लाभ मिळवण्यासाठी अनेकजण या निर्देशांकातील आश्वासक असलेल्या समभागाची खरेदी करण्यासाठी उड्या घेतात. ‘निफ्टी मिडकॅप १००’ आणि ‘निफ्टी स्मॉलकॅप १००’ या दोन निर्देशांकातील काही समभागांनी चालू वर्षात एप्रिलपासून अनुक्रमे ६६ आणि ४१ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे.
‘निफ्टी मिडकॅप १००’ निर्देशांकामधील १६ समभागांनी तर ‘निफ्टी स्मॉलकॅप १००’ या निर्देशांकामधून १८ समभागांनी एप्रिलपासून ५० टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिडकॅपमधील १६ पैकी सात आणि स्मॉलकॅपमधील १८ पैकी आठ समभाग सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे आहेत, अशी आकडेवारी एस इक्विटिजने जाहीर केल्याची माहिती मनीकंट्रोल या संकेतस्थळाने दिली. ‘निफ्टी मिडकॅप १००’ निर्देशांकाचे बाजार भांडवलीकरणात कमालीची वाढ झालेली दिसते. १ एप्रिल ते १९ डिसेंबर या काळात ३२.२९ कोटी रुपयांवरून जवळपास ४९ लाख कोटीपर्यंत बाजार भांडवलीकरणात वाढ झाली आहे. या कालावधीत निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांकाचे भांडवल १०.९ लाख कोटींवरून वाढून १८.१० लाख कोटींवर पोहोचले आहे.
मिडकॅपमधील समभाग कोणते?
निफ्टी मिडकॅप १०० मधील, अदाणी पॉवर, पॉवर फायनान्स कॉर्प, आयआरएफसी, आरईसी, युनियन बँक ऑफ इंडिया, मॅक्रोटेक डेव्हलपर्स, पॉलिकॅब इंडिया, बीएचइएल, व्होडाफोन इंडिया, एफएसीटी, जेएसडब्लू एनर्जी, औरोबिन्दो फार्मा, माझगाव डॉक शिपबिल्डर्स, प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्स, एचडीएफसी एएमसी आणि लुपिन या समभागांमध्ये ५० टक्क्यांहून अधिकची वाढ नोंदविली गेली आहे.
स्मॉलकॅपमधील समभाग कोणते?
निफ्टी स्मॉलकॅप १०० मधील इंडियन ओव्हरसिज बँक, सुझलॉन एनर्जी, आयडीबीआय बँक, बीएसई लि., एसजेव्हीएन, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कल्याण ज्वेलर्स इंडिया, युको बँक, एजंल वन, एनएलसी इंडिया, सायएंट लि, हुडको, एमआरपीएल, बिर्लासॉफ्ट, पीएनबी हाऊसिंग फायनान्स, क्रेडिट एक्सेस ग्रामीण, अपार इंडस्ट्रीज आणि केईआय इंडस्ट्रीज या समभागांमध्ये ५० टक्क्याहून अधिक नोंद झाली आहे.
दोन्ही निर्देशांकामध्ये एप्रिलपासून अनुक्रमे ६६ आणि ५१ टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे. तर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये एप्रिलपासून आपल्या मानदंडाहून (Benchmark) २० टक्क्यांची अधिक वाढ झाली आहे.
बाजारातील सतत होत असलेली वाढ सकारात्मक असून विश्लेषकांनी उच्च मूल्यांकनाचा अंदाज व्यक्त केला आहे. काही मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये वाढीव कमाई होत असल्यामुळे त्यांचे प्रदर्शनही चांगले होत असल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा >> विश्लेषण: ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या विक्रमी तेजीचे कारण काय? ती किती दिवस राहील?
बाजारात तेजी येण्याची कारणे कोणती?
बाजारात तेजी येण्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते. स्थूल अर्थशास्त्राची (macroeconomic) सुधारलेली स्थिती, अनेक ब्रोकरकडून सेन्सेक्स आणि निफ्टीसाठी वाढविलेले लक्ष्य, नुकताच तीन राज्यात झालेला भाजपाचा विजय, परकीय गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीत केलेली वाढ आणि पुढील वर्षी अपेक्षित असलेली यूएस फेड दरकपात अशा अनेक घटकांमुळे एप्रिलपासून स्थानिक इक्विटी बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. यासोबतच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केल्यामुळे भाजारात आणखी तेजीची भावना दिसून येईल, असेही सांगितले जात आहे.