अनुकूल बातम्यांच्या ओघ सुरु राहिल्याच्या सुखद प्रभावाने शेअर बाजारात गुरुवारी (१६ जानेवारी) सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टीने आगेकूच कायम ठेवली. कंपन्यांच्या तिमाही निकालातील चांगली कामगिरी, इस्त्रायल-हमास युद्धविराम, हिंडेनबर्ग रिसर्चला टाळे लावण्याची संस्थापक अँडरसन यांची घोषणा आदींच्या अनुकूल परिणामांपुढे, अमेरिकेत अपेक्षेपेक्षा जास्त किरकोळ महागाई दरातील वाढीचा बाजारावरील प्रतिकूल प्रभाव फिका पडला. तरी, परकीय गुंतवणूकदारांच्या विक्री करून माघारीचा ताणही बाजारावर कायमच असल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेन्सेक्स आणि निफ्टीने सकाळच्या सत्रातच अनुक्रमे ७७,००० आणि २३,३०० या महत्त्वाच्या पातळ्यांपुढे मजल मारली. काल (१५ जानेवारी) अमेरिकेतील वॉल स्ट्रीटवरील दोन महिन्यांतील सर्वोत्तम तेजी, त्या परिणामी पहाटे खुल्या झालेल्या आशियाई बाजारांमध्ये दिसून आलेली झेप याचेच प्रतिबिंब सेन्सेक्स-निफ्टीच्या उसळीत दिसून आले. सकाळची ही दमदार सुरुवात, दिवसभर चढ-उतारांनंतरही सत्रअखेरपर्यंत कायम राहिली.

आणखी वाचा-मार्केट-वेध : शेअर बाजारात सेन्सेक्सची २२५ अंशांची कमाई; मात्र सत्रारंभीच्या मुसंडीला, दिवसअखेर पुन्हा गळती!

नफावसुलीने घायाळ सत्रात, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३१८.७४ अंशांच्या वाढीसह, ७७,०४२.८२ अंशांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील दिवसअखेर ९८.६० अंशांच्या वाढीसह २३,३११.८० या पातळीवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांनी बुधवारच्या सत्रात साधारण ०.३० टक्क्यांची वाढ साधली होती. मुंबई शेअर बाजारात १,३११ घसरणाऱ्या समभागांच्या तुलनेत, २,६८८ असे वाढणाऱ्या समभागांचे पारडे जड ठरले.

अदानी शेअर्समध्ये ‘रिलीफ रॅली’

दोन वर्षांपूर्वी अब्जाधीश गौतम अदानी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून खळबळ उडवून देणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्च या गुंतवणूकदार कंपनीला टाळे लावत असल्याचे तिचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी समाजमाध्यमावर गुरुवारी घोषणा केली आणि त्यावर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सत्रारंभी जवळपास ७% मुसंडीसह दिलासादायी पडसाद उमटताना दिसले. अँडरसन यांनी त्यांच्या या निर्णयामागील कारणांचा उल्लेख केला नसला तरी अमेरिकेतील सत्तापालट आणि ट्रम्प प्रशासनाची राजवट सुरू होण्यापूर्वी त्यांनी टाकलेले हे पाऊल पुरेसे सूचक आहे. मात्र या परिणामी गुरुवारच्या व्यवहारात, अदानी समूहातील ध्वजाधारी कंपनी अदानी एंटरप्राइजेस (१.६६ %), अदानी पोर्ट्स (१.९४%), अदानी पॉवर (२.३४%), अदानी एनर्जी सोल्युशन्स (१.५८%), अदानी ग्रीन एनर्जी (३.४०%) आणि अदानी टोटल गॅस (१.६८%) यांनी चांगली भरारी घेतली. समूहातील अन्य शेअर्सही सकारात्मक पातळीवर व्यवहार करत होते. सकाळच्या सत्रातील त्यांची वाढ ही नफावसुलीने बाजार संपेपर्यंत काहीशी घटली.

आणखी वाचा-‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र

रिलायन्स, इन्फीच्या निकालांवर लक्ष

शेअर बाजारातील व्यवहार आटोपल्यानंतर, सायंकाळी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस, ॲक्सिस बँक यांचे तिमाही निकाल जाहीर होतील. निकालांची आकडेवारी पाहून त्यावर बाजाराची प्रतिक्रिया शुक्रवारी दिसून येईल. तथापि त्या आधी अमेरिकेतील महागाई दरातील वाढ आणि ट्रम्प यांच्या राजवटीतील संभाव्य धोरणांमुळे त्यात होऊ घातलेला भडका पाहता, परकीय गुंतवणूकदारांना स्थानिक बाजारात विक्री करून काढता पाय घेण्याच्या भूमिकेला नव्याने स्फुरण, तर देशी गुंतवणूकदारांना सावध पवित्रा घेण्यास भाग पाडले आहे, असे मेहता इक्विटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तपासे यांनी सूचित केले.