मुंबई : भांडवली बाजारात अस्थिरता असूनही प्रमुख निर्देशांक सलग पाचव्या सत्रात सकारात्मक पातळीवर स्थिरावले. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीच्या जोरावर ग्राहकोपयोगी वस्तू आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाली.
मात्र बाजाराचा सावध सूर कायम असून, आगामी जॅक्सन होल बैठकीमध्ये, फेडरल रिझर्व्हचे जेरॉम पॉवेल याच्या भाषणाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. तरी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत व्याजदर कपात होण्याबाबत वाढत्या आशावादाने बाजारावर तेजीवाल्यांनी पकड अधिक घट्ट केली आहे. परिणामी बुधवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १०२.४४ अंशांनी वधारून ८०,९०५.३० पातळीवर बंद झाला. दिवसभरात, त्याने १४९.९७ अंशांची कमाई करत त्याने ८०,९५२.८३ ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली होती. बरोबरीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेदेखील ७१.३५ अंशांची कमाई केली आणि तो २४,७७०.२० पातळीवर स्थिरावला.
हेही वाचा…हिंदुस्तान झिंककडून प्रति समभाग १९ रुपयांचा लाभांश, भागधारकांमध्ये ८,०२८ कोटी वितरित करण्याचा निर्णय
अत्यंत अरुंद पट्ट्यात अस्थिर राहिलेल्या व्यवहारात, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीने बाजाराला घसरणीतून तारले. फेडरल रिझर्व्हचे जेरॉम पॉवेल यांच्या भाषणापूर्वी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबला आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये टायटन, एशियन पेंट्स, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, बजाज फिनसर्व्ह आणि भारती एअरटेल यांचे समभाग तेजीत होते. याउलट, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्र, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक्नॉलॉजी, स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागात मात्र घसरण झाली.
हेही वाचा…गेल्या स्वातंत्र्यदिनापासून आतापर्यंत प्रमुख निर्देशांकांकडून २१ टक्के परतावा
परदेशी संस्थागत गुंतवणूकदार मंगळवारी पुन्हा निव्वळ विक्रेते ठरले असून त्यांनी १,४५७.९६ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २,२५२.१० कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले आहेत.
हेही वाचा…फोर्कास स्टुडिओ लिमिटेडचा १९ ऑगस्टपासून ‘आयपीओ’
सेन्सेक्स ८०,९०५.३० १०२.४४ (०.१३%)
निफ्टी २४,७७०.२० ७१.३५ (०.२९%)
डॉलर ८३.९१ १४
तेल ७७.४२ ०.२८