लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांकांची उच्चांकी दौड कायम असून सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारच्या सत्रात नवीन ऐतिहासिक शिखरावर स्थिरावले. जागतिक पातळीवरील सकारात्मक कल आणि निर्देशांकात सर्वाधिक वजन राखणाऱ्या आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि टीसीएस समभागांमधील तेजीने निर्देशांक विक्रमी पातळीवर पोहोचले.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६२.८७ अंशांनी वधारून ८०,०४९.६७ या नव्या शिखरावर स्थिरावला. दिवसभरात तो, ४०५.८४ अंशांनी वधारून ८०,३९२.६४ या नव्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १५.६५ अंशांची भर पडली आणि २४,३०२.१५ या विक्रमी बंद शिखरावर बंद झाला. दिवसभरातील सत्रात त्याने २४,४०१ ही सर्वोच्च पातळी गाठली.
सेन्सेक्समध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीज, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, सन फार्मास्युटिकल्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, कोटक महिंद्र बँक आणि महिंद्र अँड महिंद्र यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर दुसरीकडे, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो, टेक महिंद्र, अल्ट्राटेक सिमेंट आणि इंडसइंड बँकेच्या समभागात घसरण झाली.
हेही वाचा >>>‘एआयबीईए’च्या माध्यमातून बँक ग्राहकांसाठी विनामूल्य ‘बँक क्लिनिक’ सेवा
अमेरिकेतील महागाई नरमल्याने निर्यातीसाठी त्या बाजारपेठेवर विसंबून असलेल्या माहिती तंत्रज्ञान आणि औषधनिर्माण कंपन्यांच्या समभागांनी बाजार तेजीत आघाडी घेतली. याचबरोबर दहा वर्षे मुदतीच्या अमेरिकी रोख्यांवरील परतावा दरदेखील कमी झाल्याने बाजाराला बळ मिळाले. यातून परदेशी गुंतवणूकदारांकडून बाजारातील स्वारस्य वाढले आहे. देशांतर्गत सरकारी खर्चातील वाढ आणि कंपन्यांच्या वाढत्या कमाईमुळे त्यांचे मूल्यांकनदेखील योग्य पातळीवर असल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. सप्टेंबर महिन्यात रिझर्व्ह बँकेकडून दर कपातीच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
परदेशी गुंतवणूकदार सक्रिय
परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (एफआयआय) पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. बुधवारच्या सत्रात त्यांनी ५,४८३.६३ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली. परदेशी गुंतवणूकदारांनी सरलेल्या जून महिन्यात २९,६२८ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली. जून महिन्यात त्यांची सर्वाधिक खरेदी वित्त आणि दूरसंचार कंपन्यांच्या समभागांमध्ये करण्यात आली आहे.
सेन्सेक्स ८०,०४९.६७ ६२.८७ (०.०८)
निफ्टी २४,३०२.१५ १५.६५ (०.०६)
डॉलर ८३.५० १ पैसा
तेल ८६.८९ -०.५२