लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी उच्चांकी पातळीपासून माघारी बुधवारी फिरले आणि सत्राअखेर नकारात्मक पातळीवर स्थिरावले. धातू, वाहन निर्मिती आणि माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्याने सेन्सेक्समध्ये चार शतकी घसरण होत तो ८०,००० अंशांखाली बंद झाला. विश्लेषकांच्या मते अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीबद्दल वाढलेल्या अनिश्चिततेमुळे देशांतर्गत भांडवली बाजारात निराशाजनक वातावरण होते.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४२६.८७ अंशांच्या घसरणीसह ७९,९२४.७७ पातळीवर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्सने १२९.७२ अंशांची कमाई करत ८०,४८१.३६ हे सर्वोच्च शिखर गाठले. मात्र ही तेजी दीर्घकाळ टिकू शकली नाही. नफावसुलीमुळे सेन्सेक्समध्ये ९१५.८८ अंशांपर्यंत पडझड झाली आणि त्याने ७९,४३५.७६ या सत्रातील नीचांकी पातळीही दाखविली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने देखील २४,४६१.०५ या विक्रमी पातळीपर्यंत मजल मारली होती. मात्र दिवसअखेर तो १०८.७५ अंशांनी घसरून २४,३२४.४५ पातळीवर स्थिरावला.
‘एसआयपी’तून जूनमध्ये २१,००० कोटींचा ओघ
देशांतर्गत भांडवली बाजारात तिमाही आर्थिक कमाईच्या हंगामापूर्वी नफावसुलीवर भर दिसून आला. जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी आणि उच्च महागाईदरामुळे गुंतवणूकदारांनी समभाग विकण्याला प्राधान्य दिले. याचबरोबर चालू महिन्यात अर्थसंकल्प जाहीर होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबिला आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये, महिंद्र अँड महिंद्र, टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक्नॉलॉजी, स्टेट बँक, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स आणि कोटक महिंद्र बँकेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. मंगळवारच्या सत्रात तेजीत असलेला महिंद्र अँड महिंद्रचा समभाग बुधवारच्या सत्रात ६ टक्क्यांहून अधिक घसरला. वाहनांच्या मागणीला चालना देण्यासाठी एसयूव्ही श्रेणीतील एक्सयूव्ही ७०० ची किंमत कमी केल्याचा समभागावर नकारात्मक परिणाम झाल्याचे बाजार विश्लेषकांचे मत आहे. दुसरीकडे, एशियन पेंट्स, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स आणि भारती एअरटेलचे समभाग मात्र वधारले.
हेही वाचा >>>वर्षभरात ४.६७ कोटी नवीन नोकऱ्यांची निर्मिती – रिझर्व्ह बँक; गेल्या आर्थिक वर्षात रोजगार वाढीचा दर ६ टक्क्यांवर
सेन्सेक्स ७९,९२४.७७ -४२६.८७ (-०.५३%)
निफ्टी २४,३२४.४५ -१०८.७५ (-०.४५%)
डॉलर ८३.५१ २ पैसे
तेल ८४.८६ ०.२४%