Share Market Updates Today : अर्थसंकल्पानंतर भारतीय शेअर बाजाराची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, कॅनडा आणि मेक्सिकोवरील आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या देशांनीही प्रत्युत्तरादाखल अमेरिकेवर आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतल्यामुळे जगभरातील शेअर बाजारांचा मूड बिघडला आहे. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही पाहायला मिळाला आहे. आज बाजार उघडताच सेन्सेक्स ६७८.०१ अंकांनी घसरून ७६,८२७.९५ अंकांवर पोहोचला. तर एनएसई निफ्टी २०७.९० अंकांनी घसरून २३,२७४.२५ अंकांवर पोहोचला. यामुळे टाटा मोटर्स, टाटा स्टील, झोमॅटो, इंडसइंड बँकेत मोठी घसरण दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर बाजार उघडताच पाच मिनिटांत गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्मॉल कॅपमध्ये विक्रीचा जोर वाढला

बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी एक टक्क्यांहून अधिक घसरल्याने मिड आणि स्मॉल-कॅप विभागांमध्ये विक्रीचा जोर वाढला आहे. सकाळी ९:४५ च्या सुमारास, सेन्सेक्स ६७० किंवा ०.८७ टक्क्यांनी घसरून ७६,८३५ वर आणि निफ्टी ५०, २३०.४० अंकांनी किंवा ०.९३ टक्क्यांनी घसरून २३,२५१ वर व्यवहार करत होते.

गुंतवणूकदारांचे ५ मिनिटांत सुमारे ५ लाख कोटींचे नुकसान

बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील ४२४ लाख कोटी रुपयांवरून जवळपास ४१९ लाख कोटी रुपयांवर घसरले आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे ५ मिनिटांत सुमारे ५ लाख कोटींचे नुकसान झाले. याबाबत लाईव्ह मिंटने वृत्त दिले आहे.

आशियाई शेअर बाजारांमध्येही मोठी घसरण

अमेरिका आणि कॅनडा, मेक्सिको व चीनमधील व्यापार युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. जपानच्या निक्केई २२५ निर्देशांकासह प्रमुख आशियाई निर्देशांक २.२७ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे, तर हाँगकाँगच्या हँग सेंग निर्देशांकात २.०७ टक्क्यांनी घसरण झाली आहे. तैवानच्या निर्देशांकात सर्वात मोठी घसरण झाली, ती ३.७४ टक्क्यांहून अधिक आहे.

आशियाई शेअर बाजारांवर अनेकदा अमेरिकेच्या धोरणांचे तीव्र उमटतात. विशेषतः जेव्हा त्यात व्यापार निर्बंधांचा समावेश असतो. विशेषतः चीन जागतिक पुरवठा साखळीत महत्त्वाची भूमिका बजावतो आणि चिनी वस्तूंवरील शुल्कामुळे किंमती वाढू शकतात आणि बाजारपेठेत व्यत्यय येऊ शकतो.

(बातमी अपडेट होत आहे.)

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex crash 700 points investors lose 5 lakh crore 3 february 2025 aam