शेअर मार्केटमध्ये आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी प्रचंड उलथापालथींचा ठरला. आज बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्सनं तब्बल १ हजार अंकांची घसरण नोंदवल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्सच्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं हजारो कोटींचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. दुपारी ही घट १.४२ टक्के इतकी दिसून आली. त्यामुळे सेन्सेक्स जवळपास ७३ हजारांच्या खाली आल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे सेन्सेक्समध्ये घसरण झालेली असताना दुसरीकडे निफ्टीनंही उलटा प्रवास करत तब्बल ३५० अंकांची घट नोंदवली. शेअर बाजार बंद होताना निफ्टी २१ हजार ९००च्या घरात आल्याचं पाहायला मिळालं.
आजच्या प्रचंड मोठ्या घसरणीनंतर सेन्सेक्स ७२,७६१ वर स्थिरावला. शेअर बाजारात झालेल्या या मोठ्या घसरणीसाठी सेबीच्या प्रमुखांनी केलेल्या एका विधानाचा संदर्भ दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी सेबी अध्यक्षांनी मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉकच्या व्यवहारांमध्ये अनियमिततेची शंका उपस्थित केली होती. त्याचाच परिणाम म्हणून शेअर बाजारात ही पडझड दिसत असल्याची चर्चा आहे.
मिडकॅप व स्मॉलकॅप स्टॉकचं नुकसान
शेअर बाजारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक्सची निराशाजनक कामगिरी शेअर बाजारातल्या या प्रचंड उलथापालथीला कारण ठरल्याचंही दिसून येत आहे. आज दिवसभर मिडकॅप व स्मॉलकॅप स्टॉकची घसरण सातत्याने होत राहिली.
बाजाराची सुरुवात काहीशी आशादायक
आज सकाळी शेअर बाजार उघडला, तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टीनं काहीशी आशादायी सुरुवात केली खरी. पण काही वेळातच सुरू झालेली पडझड बाजार बंद होईपर्यंत चालूच होती. सेन्सेक्सची सुरुवात ०.४४ टक्के वाढ नोंदवून ७३ हजार ९९३.४० वर झाली. निफ्टीनंही ०.४३ टक्क्यांनी २२ हजार ४३२.४० वर वाढ नोंदवली होती.
१३.४७ लाख कोटींचं नुकसान!
दरम्यान, आज दिवसभरात शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदारांचं जवळपास १३.४७ लाख कोटींचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. बाजार उघडला तेव्हा शेअर बाजारातील एकूण गुंतवणुकीचं मूल्य ३८५.६४ लाख कोटी इतकं होतं. पण बाजार बंद होताना हे मूल्य ३७१.६९ लाख कोटी रुपये इतकं खाली आलं.