बाजाराचे कामकाज समाप्तीनंतर किरकोळ महागाई दर आणि औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर होण्याआधी, भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारी सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली.
हेही वाचा- आनंदाची बातमी : महागाईचा दिलासा कायम, डिसेंबरमध्ये ५.७२ टक्क्यांच्या दरासह वर्षातील नीचांक
दिवसभरातील अस्थिर वातावरणात गुरुवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १४७.४७ अंशांनी घसरून तो ५९,९५८.०३ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांपैकी १५ कंपन्यांचे समभाग नकारात्मक पातळीवर स्थिरावल्याने सेन्सेक्सने ६० हजार अंशांची पातळी मोडली. दिवसभरात त्याने ४७३.१८ अंश गमावत ५९,६३२.३२ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३७.५० अंशांची घसरण झाली आणि तो १७,८५८.२० पातळीवर स्थिरावला.
हेही वाचा- नवउद्यमींकडून २४ अब्ज डॉलरची निधी उभारणी, सरलेल्या वर्षात ३३ टक्क्यांची घसरण
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या टीसीएसने सरलेल्या तिमाहीतील कामगिरीनंतर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबिल्याने भांडवली बाजारात अस्थिरतेचे वातावरण होते. तसेच अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या आगामी व्याजदर वाढीकडे सगळ्यांचे लक्ष लागल्याने तेथील भांडवली बाजारात देखील अस्थिरता कायम असल्याने परदेशी गुंतवणूकदार स्वस्त गुंतवणूक पर्यायाचा शोध घेत भारतीय भांडवली बाजारात गुंतवणूक करत आहेत, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
हेही वाचा- ‘एनसीएलएटी’कडून गूगलला दिलासा नाहीच
सेन्सेक्समध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात २.११ टक्क्यांची सर्वाधिक घसरण झाली. त्यापाठोपाठ अॅक्सिस बँक (१.५४ टक्के), टाटा मोटर्स (१.४ टक्के), कोटक महिंद्र बँक (१.२६ टक्के), भारती एअरटेल (१.१२ टक्के) आणि बजाज फिनसर्व्हच्या (०.८७ टक्के) समभागात घसरण झाली. अल्ट्राटेक सिमेंटचा समभाग १.८१ टक्क्यांनी वधारला. त्यासह लार्सन अँड टुब्रो, एचसीएल टेक्नॉलॉजी, मारुती, नेस्ले आणि एचडीएफसीचे समभाग तेजीत होते.
हेही वाचा- जागतिक बँकेची विकास दर अंदाजाला कात्री
तीन सत्रात किती घसरण?
गुरुवारपर्यंतच्या तीन सत्रांमध्ये सेन्सेक्समध्ये ७८९ अंशांची घसरण म्हणजेच १.३ टक्क्यांची घसरण झाली. तर निफ्टी २४३ अंशांनी म्हणजेच १.५८ टक्क्यांनी माघार घेत १८ हजार अशांखाली आला.