Share Market Roundup: प्राप्तिकरात सवलतीद्वारे अर्थसंकल्पाने केलेली धन-कृपा, पाठोपाठ रिझर्व्ह बँकेकडून दीर्घ कालावधीनंतर झालेली व्याजदरातील कपात या अनुकूल घडामोडीही शेअर बाजारात अपेक्षित उत्साह सरलेल्या आठवड्यात निर्माण करू शकल्या नाहीत. तर नवी दिल्लीतील शनिवारी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या दमदार विजयाने तेथे डबल इंजिन सरकारच्या निर्माण केलेल्या शक्यतेने देखील सोमवारी शेअर बाजारावर अपेक्षित तेजीकारक परिणाम साधला नाही. सोमवारी (१० फेब्रुवारी) सकाळी सेन्सेक्स-निफ्टीच्या घसरणीनेच शेअर बाजार खुला झाला आणि निराशेची छाया गडद बनत जात मोठ्या घसरणीनेच त्याने दिवसाचा शेवटही केला.
संपूर्णपणे नकारात्मक राहिलेल्या सत्रात बीएसई सेन्सेक्स ५४८.३९ अंशांच्या घसरणीसह, ७७,३११.८० वर स्थिरावला. एकेसमयी तर सेन्सेक्सची घसऱण ६७१ अंशांपर्यंत विस्तारली होती आणि आजच्या सत्रात ७७ हजारांची पातळीही तो सोडेल, अशी बाजारात भीती होती. दुसरीकेडे निफ्टी १७८.३५ अंशांच्या घसरणीसह २३,३८१.६० या पातळीवर दिवसअखेर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांमध्ये प्रत्येकी पाऊण टक्क्यांची घसरण झाली. मात्र व्यापक बाजारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समधील घसरण याहून मोठी म्हणजे साधारण २ ते ३ टक्क्यांच्या घरात होती.
क्षेत्रवार निर्देशांकांच्या आघाडीवर, निफ्टी बँक Nifty Bank दिवसअखेरीस १७७.८५ अंश किंवा ०.३५% घसरणीने ४९,९८१ वर बंद झाला. निफ्टी मिडकॅप निर्देशांक २.१२% घसरला तर निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक २.२८% गडगडला.
विक्रीच्या माऱ्याने शेअर बाजाराला झोडपून काढण्याची कारणे काय?
१. धातू क्षेत्रातील शेअर्सची वाताहत
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचलित शुल्काव्यतिरिक्त सर्व पोलाद आणि अॅल्युमिनियम आयातीवर नवीन २५% अतिरिक्त शुल्क लादले जाईल, अशी घोषणा शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केली. या संबंधाने अधिकृत घोषणा या आठवड्यात केली जाईल आणि हे शुल्क तात्काळ लागू होईल, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी कोणत्या विशिष्ट देशाच्या आयातीचा उल्लेख जरी केला नसला तरी या घडामोडीमुळे भारतातील धातू क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली. जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, हिंडाल्को, वेदान्त, सेल, एनएमडीसी या प्रमुख कंपन्यांचे शेअर्स ३ ते ४ टक्क्यांनी आपटले, तर निफ्टी मेटल इंडेक्स २.९४% घसरला.
२. परकीय गुंतवणूकदारांची माघार
परकीय गुंतवणूकदारांची बाजारात शेअर्स विक्रीचा सपाटा निरंतर सुरूच असून, बाजारातील सकारात्मक भावनेस बाधा पोहचविणारा तो एक मोठा घटक बनला आहे. दुसरीकडे कंपन्यांची तिमाही कामगिरीत अपेक्षेपेक्षा वाईट राहिली असून, नजीकच्या काळात त्यात उभारी दिसून येईल अशीही चिन्हे नसल्याचे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर म्हणाले. या अंगाने भारतीय शेअर बाजाराचे आकर्षण दिसावे अशा लक्षणीय बाबीही परकीय गुंतवणूकदारांपुढे नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
३. रुपयाची सार्वकालिक नीचांक बुडी
अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांच्या जागतिक व्यापाराला डंख देणाऱ्या नव्या घोषणेने त्या देशाची चलन अर्थात अमेरिकी डॉलर मजबूत बनले. त्या चिंतेचा भारतीय रुपयाच्या मूल्याला झळ पोहचविणारा परिणाम सोमवारी दिसून आला. रुपया प्रति डॉलर ८८ ची वेसही ओलांडेल इथपर्यंत म्हणजे ८७.९५ या पातळीवर गडगडला. एका दिवसाच्या सत्रात त्यात ०.६% अशी मोठी घसरण दिसून आली. दुसरीकडे वाढत्या जागतिक अनिश्चिततेने शाश्वत मूल्य असलेले मौल्यवान धातू सोन्यांत विक्रमी तेजी सोमवारी दिसून आली.