मुंबई : इस्रायल आणि इराणमधील तणाव वाढण्याच्या भीतीने देशांतर्गत भांडवली बाजारात सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली. जागतिक पातळीवरील निराशाजनक वातावरण आणि युद्ध आणखी भडकण्याच्या शक्यतेने माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागात गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केला. परिणामी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारीही घसरत राहिले. शिवाय परदेशी गुतंवणूकदारांकडून समभाग विक्रीचा ओघ सुरू असल्याने बाजारातील घसरण वाढली.
मंगळवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४५६.१० अंशांनी घसरून ७२,९४३.६८ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात तो ७१४.७५ अंशांनी घसरून ७२,६८५.०३ पातळीपर्यंत खाली आला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने देखील १२४.६० अंशांची माघार घेत २२,१४७.९० अंशांची पातळी गाठली.
भू-राजकीय तणाव आणि नजीकच्या काळात मध्यवर्ती बँकाकडून व्याजदर कपातीच्या संभाव्यतेत घट झाल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेने सलग तिसऱ्या दिवशी घसरणीचा कल कायम राखला. अमेरिकेत किरकोळ विक्री अपेक्षेपेक्षा अधिक मजबूत वाढल्याने चिंता अधिक वाढली असून फेडरल रिझर्व्ह दर कपात करण्यास विलंब करू शकते. परिणामी डॉलर निर्देशांक आणि अमेरिकी रोख्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा… बाजारातील माणसं : जागतिक भांडवल बाजारातील अनुभवी खेळाडू : समीर अरोरा
सेन्सेक्समध्ये इन्फोसिस, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, बजाज फायनान्स, टेक महिंद्र, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि लार्सन अँड टुब्रो यांच्या समभागात घसरण झाली. तर टायटन, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, मारुती, आयटीसी, पॉवर ग्रिड आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग तेजीत होते. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारच्या सत्रात ३,२६८ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.
सेन्सेक्स ७२,९४३.६८ -४५६.१० (-०.६२%)
निफ्टी २२,१४७.९० – १२४.६० (-०.५६%)
डॉलर ८३.५७ १४
तेल ८९.८७ -०.२६%