मुंबई: विद्यमान ऑक्टोबर महिन्यांत अलीकडच्या इतिहासात भांडवली बाजारातून विदेशी संस्थागत गुंतवणुकीच्या सर्वाधिक माघारीची नोंद झाली असून, या महिन्यात आतापर्यंत, विदेशी गुंतवणूकदारांकडून झालेली समभागांतील निव्वळ विक्री ७७,७०१ कोटी रुपयांच्या घरात जाणारी असल्याचे ‘एनएसडीएल’कडून प्रसृत आकडेवारी दर्शविते. परिणामी भांडवली बाजाराला लक्षणीय अस्थिरतेने घेरले असून, प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी पुन्हा घसरण उत्तरोत्तर विस्तारत चालली आहे.

सोमवारी सत्राच्या सुरुवातीला ५४५ अंशांपर्यंत उसळलेल्या सेन्सेक्सने त्या पातळीपासून ९५८.७९ अंशांची गटांगळी घेत ८०,८११.२३ चा नीचांक दाखवला. सत्राच्या उत्तरार्धात पुन्हा सावरत दिवसअखेर हा निर्देशांक ७३.४८ अंश (०.०९ टक्के) गमावून ८१,१५१.२७ पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्समधील ३० पैकी २१ समभाग घसरले, तर नऊ समभागांचे भाव वधारले. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक ७२.९५ अंशांच्या (०.२९ टक्के) घसरणीसह २४,७८१.१० वर बंद झाला.

हेही वाचा >>> मुंबईसह महाराष्ट्राच्या स्थावर मालमत्ता प्रकल्पांत २,००० कोटींच्या गुंतवणुकीचे एम्मार इंडियाचे नियोजन

करोनाचे संकट आणि देशव्यापी टाळेबंदीच्या भीतीतून मार्च २०२० मध्ये विदेशी संस्थांगत गुंतवणूकदारांकडून बाजारात मोठी समभाग विक्री केली गेली. परंतु त्यासमयी झालेल्या विक्रीलाही यंदा ऑक्टोबरमध्ये सुरू असलेल्या विक्रीने मागे टाकले आहे. तेव्हा त्या महिन्यांतील त्यांची निव्वळ समभाग विक्री ६१,९७२,७५ कोटी रुपये होती. हे पाहता ऑक्टोबर हा विदेशी गुंतवणुकीच्या माघारीचा ऐतिहासिक महिना ठरला आहे. मात्र याच महिन्यात आतापर्यंत देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंडांनी बाजारात ७४,१७६.२० कोटी रुपयांची खरेदीही झाली असल्याचे नोंद आकडेवारी दर्शविते. हा तोल साधला गेल्यामुळेच सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांकांत त्यांच्या अत्युच्च शिखर पातळीपासून जेमतेम ५ टक्क्यांची घसरण दिसून येते. तथापि निर्देशांकांपेक्षा विशिष्ट समभागांमधील घसरण ही ३० टक्क्यांहून अधिक मोठी आहे.

हेही वाचा >>> इंडेल मनी रोखे विक्रीतून १५० कोटी उभारणार; ६६ महिन्यांत गुंतवणुकीवर दुपटीने लाभ

सध्या सुरू असलेल्या निकाल हंगामात, कंपन्यांच्या तिमाही कामगिरीवर गुंतवणूकदारांची संमिश्र प्रतिक्रिया दिसून येत आहे. परिणामी भांडवली बाजारातील व्यवहारातही प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या तिमाहीत कमाईने गुंतवणूकदारांना खूश न केल्याने बँकेच्या सोमवारी समभागांत ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी हा सर्वाधिक घसरण झालेला समभाग ठरला. दुसरीकडे खासगी बँकांतील अग्रणी एचडीएफसी बँकेने शनिवारी जाहीर केलेल्या सप्टेंबर तिमाहीच्या निकालांचे गुंतवणूकदारांनी स्वागत केले आणि या बँकेच्या समभागांत साडेतीन टक्क्यांची वाढ झाली.

वध-घटीचे हिंदोळे

देशांतर्गत बाजारपेठेत लक्षणीय अस्थिरता दिसून येत आहे. परिणामी प्रमुख निर्देशांकांचा दिवसभरात नकारात्मक आणि सकारात्मक कल निरंतर बदलत, वर-खाली हेलकावे सुरू आहेत. यातच विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचे ‘भारतात विक्री, तर चीनमध्ये खरेदी’चे धोरण स्थानिक बाजाराचा घात करीत आहे. कंपन्यांची कमकुवत तिमाही कमाईची कामगिरी आणि मूल्यांकनाच्या चिंतेमुळे भारतात विदेशी गुंतवणूदार वर्गाकडून विक्रीला जोर चढला आहे. तथापि, देशी संस्थागत गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंडाकडून सुरू असलेल्या खरेदीने बाजारातील घसरणीला काहीसा बांध घालून अपेक्षित आधार दिल्याचेही दिसत आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

आघाडीच्या समभागांपेक्षा विक्रीचा अधिक मोठा फटका हा तळच्या व मधल्या फळीतील समभागांना बसत आहे. परिणामी बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सोमवारी अनुक्रमे १.६३ टक्के आणि १.५१ टक्के असे मोठ्या फरकाने घसरले. मुंबई शेअर बाजारातील एकूण २,९१४ समभाग घसरले तर वाढ साधलेले समभाग १,१२३ असे निम्म्याहून कमी होते.