लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: व्यापार युद्धाचा भडका आणि अमेरिकेसह जगभरावर मंदीच्या छायेच्या चिंतेतून जागतिक बाजारपेठांमध्ये झालेल्या समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे शुक्रवारी स्थानिक बाजारातही भीतीदायी पडसाद उमटले. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये ९०० अंशांहून अधिक घसरण होऊन तो ७६,००० च्या पातळीच्या खाली ढासळला.

खनिज तेलाच्या किमतीतील घसरण आणि निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो आणि इन्फोसिस या बाजारातील दिग्गज कंपन्यांच्या समभागात विक्री झाल्याने बाजारातील निराशेत आणखी भर पडली, असे विश्लेषकांनी मत व्यक्त केले. परिणामी सप्ताहातील अखेरच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९३०.६७ अंशांनी म्हणजेच १.२२ टक्क्यांनी घसरून ७५,३६४.६९ वर स्थिरावला. दिवसभरात त्याने १,०५४.८१ अंश गमावत ७५,२४०.५५ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३४५.६५ अंशांची (१.४९ टक्के) घसरण झाली आणि तो २२,९०४.४५ पातळीवर बंद झाला.

सेन्सेक्सधील टाटा स्टील सर्वाधिक ८.५९ टक्क्यांनी गडगडला. त्यापाठोपाठ टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो, अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, टेक महिंद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मास्युटिकल, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि एनटीपीसी या कंपन्यांचे समभाग नकारात्मक पातळीवर स्थिरावले. दुसरीकडे, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, एशियन पेंट्स आणि ॲक्सिस बँक यांचे समभाग मात्र तेजीत होते.

जागतिक शेअर बाजारातील घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात प्रमुख निर्देशांकांमध्ये पडझड झाली. क्षेत्रीय पातळीवर विविध निर्देशांक प्रत्येकी २-६ टक्क्यांपर्यंत घसरले. ट्रम्प यांच्या नवीन व्यापार धोरणामुळे मंदी येण्याची शक्यता असून अमेरिकेतही महागाई वाढेल. आगामी काळात हे अरिष्ट इतर प्रमुख अर्थव्यवस्थांनाही गिळंकृत करेल, या भीतीने गुंतवणूकदारांमध्ये घर निर्माण केले आहे. मंदी आली तर मागणीला फटका बसण्याच्या शक्यतेने धातू आणि तेल वितरण कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाली, असे निरीक्षण मेहता इक्विटीज लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तापसे यांनी नोंदवले.

अमेरिकी मंदीच्या भीतीने हाहा:कार

गुरुवारी अमेरिकेच्या प्रमुख शेअर बाजार निर्देशांकांमध्ये २०२० नंतरची सर्वात मोठी टक्केवारीतील घसरण नोंदवण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर कर धोरणामुळे जागतिक मंदीच्या भीतीने एस अँड पी ५०० निर्देशांकातील कंपन्यांनी एकत्रितपणे २.४ (ट्रिलियन) लाख कोटी अमेरिकी डॉलरचे बाजार मूल्य केवळ काही तासात गमावले. १६ मार्च २०२० रोजी जागतिक बाजारपेठेत करोना साथीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जे नुकसान झाले, त्यानंतरचा हा एका दिवसातील सर्वात मोठा तोटा आहे. नॅसडॅक निर्देशांकानेही सहा टक्क्यांची ऐतिहासिक घसरण नोंदविली.

रुपया ५ पैशांनी वधारून ८५.२५ वर

डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारच्या सत्रात ५ पैशांनी वधारून ८५.२५ पातळीवर स्थिरावला. कमकुवत डॉलर निर्देशांक आणि खनिज तेलाच्या किमतींमध्ये सहा टक्क्यांची तीव्र घट झाल्यामुळे रुपयाला बळ मिळाले. मात्र भांडवली बाजारातील पडझड आणि परदेशी निधीच्या बहिर्गमनामुळे रुपयातील वाढ मर्यादित राहिली. रुपयाने ८५.०७ प्रति डॉलर पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली आणि नंतर दिवसभरात ८४.९६ चा उच्चांक आणि ८५.३४ ही नीचांकी पातळी त्याने गाठली होती.

गुंतवणूकदारांना १० लाख कोटींची झळ

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९०० अंशांहून अधिक घसरून ७६,००० च्या पातळीच्या खाली घसरल्याने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १० लाख कोटी रुपयांची घसरण झाली. गेल्या दिन सत्रात सेन्सेक्स १२,०० अंशांहून अधिक कोसळला आहे. शेअर बाजारातील निराशाजनक वातावरणामुळे मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल ९.९८ लाख कोटी रुपयांनी घसरून ४०३.३४ लाख कोटी रुपयांपर्यंत (४.७३ ट्रिलियन अमेरिकी डॉलर) खाली आले आहे.

सेन्सेक्स ७५,३६४.६९ -९३०.६७ -१.२२%

निफ्टी २२,९०४.४५ -३४५.६५ -१.४९%

तेल ६७.८५ – ३.२६%

डॉलर ८५.२५ -५पैसे