मुंबई: देशांतर्गत भांडवली बाजारापासून फारकत घेत असलेले परदेशी गुंतवणूकदार आणि वाहन निर्मिती कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेला विक्रीचा मारा यामुळे शुक्रवारी सलग चौथ्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टीमध्ये अर्ध्या टक्क्यांहून अधिक घसरण झाली. अमेरिकी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून व्यापार धोरणांबत कठोर पावले उचलली जात असल्याने बाजारात भीतीचे वातावरण आहे.  

शुक्रवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४२४.९० अंशांनी घसरून ७५,३११.०६ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ६२३.५५ अंश गमावत ७५,११२.४१ पातळीला स्पर्श केला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ११७.२५ अंशांची घसरण झाली आणि तो २२,७९५.९० पातळीवर बंद झाला.

परदेशी गुंतवणूकदारांकडून अविरत समभाग विक्री, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, समभागांचे महागडे मूल्यमापन आणि अमेरिकेने जशास तसे व्यापार शुल्क आकारण्याची दिलेली धमकी यासारख्या नकारात्मक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबिला आहे. शुक्रवारच्या सत्रात धातू वगळता, देशांतर्गत बाजारातील घसरणीचे नेतृत्व बँकिंग, माहिती-तंत्रज्ञान, दूरसंचार, वाहन निर्मिती, गृहनिर्माण आणि तेल आणि वायू समभागांमधील घसरणीने केले, असे मत मेहता इक्विटीज लिमिटेड वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तापसे यांनी केले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये महिंद्र अँड महिंद्रचा समभाग ६ टक्क्यांहून अधिक घसरला. तर त्यापाठोपाठ अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स, सन फार्मा, पॉवर ग्रिड, झोमॅटो, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या समभागांची कामगिरी निराशनजनक राहिली. मात्र टाटा स्टील, लार्सन अँड टुब्रो, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक आणि एनटीपीसी या कंपन्यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारच्या सत्रात ३,३११.५५ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा