मुंबई : निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या कंपन्यांच्या समभागातील घसरणीने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीला झळ पोहोचली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २२,७९४ च्या सर्वोच्च उच्चांकी पातळीवरून ४४६ अंशांनी घसरला, तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सत्रातील ७५,०९५ या उच्चांकावरून १,६२८ अंशांनी कोसळला.
विश्लेषकांच्या मते, लोकसभा निवडणुकीपूर्वीची बाजार अस्थिरता, कंपन्यांचा कमाईचा हंगाम यामुळे भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार झाले. राजकीय स्थैर्य प्रस्थापित झाल्यास, नजीकच्या काळात तेजीचा वेग कायम राहील, अशी आशा बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा – इंडेजीनचा ‘आयपीओ’ ६ मेपासून गुंतवणुकीस खुला
गुंतवणूकदारांनी दूरसंचार, भांडवली वस्तू आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा मारा केल्याने शुक्रवारी निफ्टीने विक्रमी उच्चांकावरून माघार घेतली. रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो आणि एचडीएफसी बँकेच्या समभागात मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव आल्यानेही निर्देशांक खाली खेचले गेले.
सेन्सेक्स ७३२.९६ अंशांनी घसरून ७३,८७८.१७ पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्सने दिवसभरात ७५,०९५.१८ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. आणि निफ्टीने देखील सकाळच्या सत्रात २२,७९४.७० ही ५२ आठवड्यातील ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र दुपारच्या सत्रातील पडझडीने तो १७२.३५ अंशांच्या घसरणीसह २२,४७५.८५ पातळीवर बंद झाला.
अमेरिकेतील रोजगार आकडेवारी जाहीर होण्याआधी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत नफा-वसुलीला प्राधान्य दिले. सरलेल्या चौथ्या तिमाहीतील सकारात्मक निकाल, खनिज तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे येत्या काळात बाजार पुन्हा सावरण्यास मदत होऊ शकते. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी अजूनही नव्या दमाने बाजारात सक्रिय झाले नसल्याने लार्ज कंपन्यांचे समभाग अजूनही मर्यादित पातळीत व्यवहार करत आहेत, असे निरीक्षण जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
हेही वाचा – ईएसजी’ मानांकनासाठी इक्राच्या उपकंपनीला सेबीची मान्यता
सेन्सेक्समध्ये लार्सन अँड टुब्रो, मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक महिंद्र बँक आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या समभागात घसरण झाली. तर दुसरीकडे बजाज फिनसर्व्ह, महिंद्र अँड महिंद्र, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिसचे समभाग तेजीसह स्थिरावले.
सेन्सेक्स ७३,८७८.१७ -७३२.९६
निफ्टी २२,४७५.८५ -१७२.३५
डॉलर ८३.४३ -३
तेल ८३.६२ -०.०६