लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी मुंबईः लक्ष्मीपूजनानिमित्त भांडवली बाजारात शुक्रवारी सायंकाळी तासाभरासाठी झालेल्या मुहूर्ताच्या विशेष व्यवहारात सेन्सेक्स ३३५ अंशांनी वाढला. सरलेल्या ऑक्टोबरमध्ये अत्युच्च उच्चांकापासून जवळपास साडेपाच हजारांचे नुकसान सोसलेल्या निर्देशांकांनी उत्साहवर्धक वळण घेत दाखविलेली ही वाढ, नव्याने सुरू झालेल्या २०८१ सवंत्सरासाठी शुभसूचक ठरेल, अशा आशा म्हणूनच गुंतवणूकदारांमध्ये बळावल्या आहेत. सायंकाळी ७ वाजता बाजारातील मुहूर्ताचे व्यवहार आटोपले तेव्हा सेन्सेक्स ३३५.०६ अंशांनी वाढून ७९,७२४.१२ या पातळीवर स्थिरावला. तर निफ्टी निर्देशांक ९४.२० अंशांच्या कमाईसह २४,३०४.३५ वर बंद झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Gold Price: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याचे भाव कमी झाले का? गुगलवरही ट्रेंड होणारा सोन्याचा आजचा भाव पाहा

शुक्रवारी पूर्ण दिवस भांडवली बाजारातील व्यवहार बंद होते. सायंकाळी ६ वाजता सुरू झालेल्या विशेष सत्राची सुरुवात मात्र सेन्सेक्सने ६३५ अंशांची झेप घेत ८० हजारांपुढे मजल मारत केली होती. परंपरेप्रमाणे मुहूर्ताला प्रातिनिधिक स्वरूपाची का होईना समभाग खरेदी करण्याचा गुंतवणूकदारांमध्ये प्रघात रूळला आहे. मागील दिवाळी ते यंदाच्या दिवाळीपर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टी हे निर्देशांक अनुक्रमे २२.३१ टक्के आणि २४.६० टक्के असे वाढले आहे. गुरुवारी मावळलेल्या संवत्सर २०८० मध्ये सेन्सेक्सने १४,४८४.३८ अंशांची भर घातली, तर निफ्टी निर्देशांक ४,७८० अंशांनी उसळला आहे. वर्षभराच्या कालावधीतील तेजीने गुंतवणूकदारांच्या झोळीत तब्बल १२४.४२ लाख कोटी रुपयांची मत्ता टाकली आहे.

हेही वाचा >>> Bibek Debroy Passes Away : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे निधन

सरलेला ऑक्टोबर हा करोनाछायेतील मार्च २०२० मध्ये अनुभवलेल्या पडझडीपेक्षा भयाण असा निर्देशांकासाठी सर्वाधिक घसरणीचा काळा महिना ठरला. अगदी दिवाळी सुरु झाली तर बाजारावरील घसरणीचे सावट कायम होते, परिणामी काल (गुरुवारी) सेन्सेक्स ५५३ अंशांनी आपटला. त्या तुलनेत शुक्रवारी मुहूर्ताला जागतिक बाजारांचा नकारात्मक कल असूनही सेन्सेक्स-निफ्टीतील सत्रारंभाचा जोम शेवटपर्यंत कायम टिकून राहिला. सेन्सेक्समधील ३० पैकी २६ समभाग, तर निफ्टीतील ५० पैकी ३७ समभागांचे मूल्य मुहूर्ताच्या विशेष सत्रात वाढले. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकांनी तर अनुक्रमे १.१६ टक्के आणि ०.६९ टक्के अशी मुख्य निर्देशांकांपेक्षा सरस वाढ ही बाजारातील सर्वव्यापी खरेदीच्या उत्साहाला दर्शविणारी होती.

नवीन संवत्सर २०८१ मध्ये गुंतवणूकदारांनी मावळलेल्या संवत्सराप्रमाणे उच्च परताव्याच्या अपेक्षेने डावपेच आखले तर त्यांच्या पदरी निराशा आणि अपेक्षाभंगच येईल. – नीलेश शहा, व्यवस्थापकीय संचालक, कोटक महिंद्र बँक

चोखंदळपणे काही निवडक समभागांवर बाजी लावल्यास, गुंतवणूकदारांना बक्कळ लाभ मिळू शकेल. निवड मात्र सूज्ञतेने केली जावी. – जिमीत मोदी, संस्थापक सॅम्को सिक्युरिटीज

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex gains 335 degrees on muhurat trading day print eco news zws