मुंबई : भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीची तेजीची दौड कायम असून मंगळवारच्या सत्रात, दोन्ही निर्देशांक पुन्हा नव्या विक्रमी शिखरावर विराजमान झाले. वाहननिर्मिती क्षेत्र, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागातील खरेदी आणि परकीय निधीचा अखंड प्रवाह मंगळवारी निर्देशांकांच्या पुन्हा उभारीस उपकारक ठरला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३९१.२६ अंशांनी वाढून ८०,३५१.६४ च्या नव्या शिखरावर स्थिरावला. दिवसभरात, त्याने ४३६.७९ अंशांची कमाई करत ८०,३९७.१७ या नवीन विक्रमाला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ११२.६५ अंश भर घालत २४,४३३.२०च्या सर्वोच्च पातळीवर स्थिरावला. दिवसभरात, या निर्देशांकानेही २४,४४३.६० च्या नवीन विक्रमी शिखराला स्पर्श केला.

देशांतर्गत आणि जागतिक असे दोन्ही घटक बाजाराला गती देत आहेत. देशभर पसरलेला मान्सून आणि खरीप पेरणीच्या प्रगतीमुळे सध्या ग्राहकोपयोगी वस्तू आणि वाहन निर्मिती क्षेत्रात मागणी वाढण्याच्या आशेने सकारात्मक वातावरण आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

हेही वाचा >>> ‘बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना’ (भाग २)

सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये, मारुती सुझुकी, महिंद्र अँड महिंद्र, टायटन, सन फार्मा, आयटीसी, नेस्ले आणि टाटा मोटर्सचे समभाग तेजीत होते. दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्र बँक, बजाज फायनान्स आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या समभागात घसरण झाली. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४५१.२७. लाख कोटींच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. मंगळवारच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.५६ लाख कोटींची भर पार पडली. त्यासह बाजार भांडवल ५.४१ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे.

हेही वाचा >>> Gold-Silver Price: ग्राहक आनंदी! दरवाढीनंतर सोन्याच्या दरात घसरण, १० ग्रॅमची किंमत ऐकून होऊ लागली गर्दी

 ‘ऑटो’ला गतिमानता

उत्तर प्रदेश सरकारने पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी हायब्रिड अर्थात संकरित इंधन प्रकारातील वाहनांवरील नोंदणी कर माफ केल्याच्या वृत्ताने वाहन कंपन्यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले. मारुती सुझुकी इंडियाचा समभाग ७ टक्क्यांहून अधिक वधारला. तो ६.६० टक्क्यांनी वाढून १२,८२०.२० रुपयांवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ७.७२ टक्क्यांची उसळी घेतली होती. त्यापाठोपाठ महिंद्र अँड महिंद्रचा समभाग २.५१ टक्क्यांनी, हिरो मोटो कॉर्प १.५३ टक्क्यांनी, टीव्हीएस मोटर कंपनी १.६३ टक्के तर टाटा मोटर्सचा समभाग १.२४ टक्क्यांनी वधारला. मुंबई शेअर बाजारातील ऑटो निर्देशांक २.१७ टक्क्यांनी वाढून ५८,७०६.४२ वर स्थिरावला.

सेन्सेक्स ८०,३५१.६४ ३९१.२६ ०.४९

निफ्टी २४,४३३.२० ११२.६५ ०.४६

डॉलर ८३.४९ -१ पैसा

तेल ८५.३१ -०.५१%