Share Market Updates Today: मुंबई शेअर बाजारात गुरुवारी दुपारी बेंचमार्क इक्विटी निर्देशांकांमध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. जागतिक बाजारपेठेत मजबूत संकेत आणि परदेशी निधीच्या सततच्या वाढत्या ओघामुळे सेन्सेक्सने १,४०० अंकांहून अधिकची उसळी घेतली आहे. दुसरीकडे निफ्टी ५० निर्देशांकाने २३,८०० अंकांचा टप्पा पुन्हा गाठला आहे. दरम्यान आज शेअर बाजार उघडला तेव्हा हे दोन्ही निर्देशांक नाकारात्मक उघडले होते. पण, त्यानंतर दुपरी दोन्ही निर्देशांकांनी उसळी घेतली. यामुळे सलग चौथ्या दिवशीही मुंबई शेअर बाजार तेजीच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

भारतीय निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी आजा नकारात्मक उघडले होते. सकाळच्या सत्रात दोन्ही निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत होते. सेन्सेक्स ७६,९०० च्या खाली घसरला होता, तर निफ्टी २३,३५० च्या आसपास व्यवहार करत होता. मात्र, त्यानंतर दुपारच्या सत्रात दोन्ही निर्देशांकांनी जबरदस्त उसळी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

तत्पूर्वी यूएस फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्यापार तणावामुळे महागाई नियंत्रण आणि विकासावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केल्यानंतर अमेरिकन बाजारांमध्ये घसरण झाली होती. त्याचा परिणाम जागतिक शेअर बाजारांवरही झाल्याने आज शेअर बाजार नकारात्मक उघडले होते. मात्र, त्यानंतर दुपारच्या सत्रात आशियाई बाजारपेठांमध्ये काही प्रमाणात तेजी दिसून येत आहे, जपानचा निक्केई आणि दक्षिण कोरियाचा कोस्पीही सकारात्मक स्थितीत आहेत.

शेअर बाजारातील तेजीची कारणे

रुपया वधारला

परकीय भांडवलाची आवक आणि जागतिक स्तरावर मंदावलेल्या डॉलरबॅकमुळे भारतीय रुपया सलग चौथ्या दिवशी वधारला आहे. आज सुरुवातीच्या सत्रात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १० पैशांनी वाढून ८५.५४ वर पोहोचला होता. तर बुधवारी रुपया १६ पैशांनी वधारला होता.

जागतिक बाजारपेठेतील तेजीचे संकेत

आशियाई शेअर बाजारांमध्ये आज मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी १ टक्क्यांहून अधिक, जपानचा निक्केई २२५, १.३२ टक्क्यांहून अधिक आणि हाँगकाँगचा हँग सेंग १ टक्क्यांहून अधिक वधारला आहे.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा ओघ

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही निव्वळ खरेदीदार राहिले आहेत. बुधवारी, एफआयआयंनी ३,९३६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २,५१३ कोटी रुपयांचा नफा कमावला.