मुंबई : गुंतवणूकदारांनी तंत्रज्ञान आणि वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीचा धडाका लावल्याने, निफ्टीने गुरुवारी नव्या सार्वकालिक उच्चांकाला गाठले, तर सेन्सेक्सने ५०० अंशांहून अधिक वाढ साधत, बुधवारच्या घसरणीला पूर्णत्वाने भरून काढले. युरोझोन क्षेत्रातील अर्थव्यवस्थांसंबंधाने सकारात्मक ठरेल अशी प्रसिद्ध झालेली ‘पीएमआय’ आकडेवारी आणि अमेरिकेतील तंत्रज्ञान समभागांच्या प्रभावी मिळकत कामगिरीच्या वृत्तामुळे देशांतर्गत बाजाराने दिवसाच्या नीचांकी स्थितीतून उभारी घेत मोठ्या कमाईसह झेप घेतली.
हेही वाचा >>> Gold-Silver Price on 22 February 2024: सोन्याचा भाव उतरला, खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे नवे दर
बुधवारप्रमाणेच भांडवली बाजारात गुरुवारच्या सत्रावर बहुतांश काळ अस्थिरतेचा सावट कायम होते. तथापि व्यवहाराच्या शेवटच्या एका तासाभरात प्रमुख निर्देशांकांनी जोरदार मुसंडी घेतली. परिणामी सेन्सेक्स ५३५.१५ अंशांनी (०.७४ टक्के) वाढून ७३,१५८.२४ अंशांवर बंद झाला. या निर्देशांकाने सत्रांतर्गत ७३,२५६.३९ अंशांच्या उच्चांकाला गवसणी घातली. दुसरीकडे निफ्टी निर्देशांकाने १६२.४० अंशांची (०.७४ टक्के) कमाई करून २२,२१७.४५ अंशांच्या आजवर कधीही न पाहिलेल्या सर्वोच्च पातळीवर विश्राम घेतला. निफ्टीने यापूर्वी २० फेब्रुवारीला २२,१९६.९५ असे सार्वकालिक शिखर नोंदवले होते, ते गुरुवारच्या ताज्या ऐतिहासिक उच्चांकी बंद पातळीने मोडीत काढले. सत्रादरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या या निर्देशांकाने २२,२५२.५० अंशांचा शिखर स्तरही दाखवला.
हेही वाचा >>> प्लास्टिक्स उत्पादनातील ‘पूर्व फ्लेक्सीकॅप’ची येत्या आठवड्यात ४० कोटींची प्रारंभिक समभाग विक्री
सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २२ समभाग सकारात्मक पातळीवर बंद झाले आणि तर निफ्टीच्या निम्म्या म्हणजे २५ घटकांनी सत्राची समाप्ती सकारात्मक केली. सेन्सेक्समध्ये, एचसीएलटेक सर्वाधिक ३.१२ टक्क्यांनी वाढला, त्यापाठोपाठ आयटीसी २.७३ टक्क्यांनी, महिंद्र अँड महिंद्र २.६१ टक्क्यांनी, तर टीसीएस २.४४ टक्क्यांनी वाढला. वाहन क्षेत्रातील अग्रणी मारुती १.७९ टक्क्यांनी, तर टाटा मोटर्स १.२० टक्क्यांनी वधारला. टेक महिंद्र, विप्रो, एल अँड टी या समभागांनीही वाढ साधली.
व्यापक बाजारात खरेदीचा बहर दिसून आला. परिणामी लार्जकॅप निर्देशांकाने ०.८१ टक्क्यांनी वाढ साधली असताना, बहुसंख्या असलेल्या मधल्या आणि तळच्या फळीचे प्रतिनिधित्व करणारा बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे ०.९२ टक्के आणि ०.५४ टक्क्यांनी वधारला.
बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने त्यांच्या सहा दिवसांच्या विजयी आगेकूचीला मुरड घातली होती आणि सेन्सेक्स ४३४.३१ अंशांनी घसरून ७२,६२३.०९ वर, तर निफ्टी १४१.९० अंशांनी घसरून २२,०५५.०५ अंशांवर बंद झाला होता.