लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: अपेक्षेप्रमाणे अमेरिकेतील महागाई दरातील नरमाई आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या आशेने जगभरातील भांडवली बाजारात आशावादी उत्साहाचे पडसाद स्थानिक बाजारातही बुधवारी उमटले. माहिती-तंत्रज्ञान समभागांमध्ये झालेल्या चौफेर खरेदीने सेन्सेक्सला बळ मिळाले आणि त्याने पुन्हा एकदा ७९,००० अंशांपुढे वाढ नोंदवली.
बुधवारच्या सत्रात दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १४९.८५ अंशांनी वधारून ७९,१०५.८८ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने २७२.९१ अंशांची कमाई करत ७९,२२८.९४ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४.७५ अंशांची किरकोळ वाढ झाली. तो २४,१४३.७५ या पातळीवर विसावला.
हेही वाचा >>>Gold-Silver Price: घसरणीनंतर सोन्याचे दर कडाडले, पाहा मुंबई-पुण्यातील १० ग्रॅम सोन्याची किंमत
जागतिक बाजारपेठांमध्ये सकारात्मक हालचाली निदर्शनास आल्या, तरी देशांतर्गत भांडवली बाजारात एका मर्यादित पातळीत व्यवहार सुरू होते. अमेरिकेमध्ये किरकोळ महागाई दराच्या आघाडीवर सकारात्मक घसरणीची अपेक्षा आहे. परिणामी, अमेरिकी मध्यवर्ती बँकेकडून सप्टेंबरमध्ये नियोजित बैठकीत व्याजदर कपातीसाठी ठोस पाऊल पडण्याची शक्यता आहे. याच आशेवर देशांतर्गत आघाडीवर आयटी कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस २.३ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्र, इन्फोसिस, महिंद्र अँड महिंद्र आणि टाटा मोटर्सचे समभाग तेजीसह स्थिरावले. दुसरीकडे धातू क्षेत्रात मात्र पडझड झाल्याने जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड आणि बजाज फिनसर्व्हचे समभाग पिछाडीवर राहिले. व्यापक बाजारपेठेचे प्रतिनिधित्व करणारे, स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक अनुक्रमे ०.५७ टक्के आणि ०.४१ टक्क्यांनी घसरले.
हेही वाचा >>>कर शून्यावर आणण्याची माझी इच्छा; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची कबुली
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) मंगळवारी २,१०७.१७ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) १,२३९.९६ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले. गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त भांडवली बाजारातील व्यवहार बंद राहतील.
सेन्सेक्स ७९,१०५.८८ १४९.८५ ( ०.१९%)
निफ्टी २४,१४३.७५ ४.७५ ( ०.०२%)
डॉलर ८३.९५ -२
तेल ८१.१७ ०.५९