लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबईः परकीय गुंतवणूकदारांच्या खरेदीच्या जोरावर सुरू असलेल्या वेगवान आणि उत्साही तेजीत, मागील सात सलग सत्रांमधून सेन्सेक्स आणि निफ्टीने ८ टक्क्यांहून अधिक वाढ साधली असून, या मालिकेत बुधवारी सेन्सेक्सने ८०,००० चा टप्पा ओलांडला आणि आता निफ्टीला देखील २४,५०० चा स्तर खुणावताना दिसत आहे.
तेजीवाल्यांनी पूर्ण ताबा मिळविलेल्या भांडवली बाजारात, बुधवारच्या उत्साही सत्राअखेरीस सेन्सेक्स ५२०.९० अंश (०.६५ टक्के) कमाईसह ८०,११६.४९ वर स्थिरावला. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक १६१.७० अंशांची (०.६७ टक्के) भर घालत २४,३२८.९५ वर बंद झाला. मुंबई शेअर बाजारात २,०७८ समभाग वधारले तर १,८७३ समभाग घसरणीत होते. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.९४ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.२६ टक्क्यांनी वाढला.
बाजाराची गतिमान आगेकूच ही प्रामुख्याने परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून निरंतर सुरू असलेल्या खरेदीमुळे सुरू आहे. माहिती-तंत्रज्ञान (आयटी) सेवा क्षेत्र आणि बँकांकडून दिसून आलेली सशक्त आर्थिक कामगिरी आणि जागतिक व्यापारात भारताला असलेले अनुकूल स्थान हे घटक गुंतवणूकदारांच्या उत्साही भावनांना चालना देत आहेत. एकंदर देशांतर्गत मूलभूत घटक अनुकूल आहेत. अमेरिकी मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांच्या हकालपट्टीचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट करणाऱ्य़ा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदेशामुळे अमेरिकी बाजारातील अस्वस्थताही संपुष्टात आली आहे. चीनवरील आयात करांसंबंधाने ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे अमेरिका-चीन तणाव कमी होण्याची शक्यता दिसून येते. याच कारणांनी बाजारात देशी-परदेशी गुंतवणूकदारांची सुरू असलेल्या सततच्या खरेदीने स्थानिक बाजाराला मजबूत आधार मिळवून दिला आहे, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य रणनीतीकार व्हीके विजयकुमार म्हणाले.
सेन्सेक्समधून, एचसीएल टेकने सर्वाधिक ७.७२ टक्क्यांची, तर त्या पाठोपाठ टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, इन्फोसिस, महिंद्र अँड महिंद्र, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा स्टील, भारती एअरटेल आणि मारुती हे समभाग नफ्यात राहिले. अलीकडच्या तीव्र वाढीनंतर बँकांच्या समभागांत विक्री झाली, ज्यामध्ये आघाडीची एचडीएफसी बँकेत १.९८ टक्क्यांची घसरण झाली. कोटक महिंद्र बँक, स्टेट बँक, अॅक्सिस बँक, आयटीसी आणि अल्ट्राटेक सिमेंट देखील घसरणीच्या यादीतील समभाग होते.
तब्बल ३६.६५ लाख कोटींची श्रीमंती
भांडवली बाजारातील तेजीच्या मालिकेच्या सात दिवसांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३६.६५ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. या काळात सेन्सेक्सने ६,२६९.३४ अंशांची अर्थात ८.४८ टक्क्यांनी वाढ साधली आहे. निफ्टी निर्देशांकांतही आठ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.