मुंबई: प्रतिकूल बाह्य घडामोडींपायी निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या कंपन्यांच्या समभाग गडगडल्याने गुरुवारी सलग तिसऱ्या सत्रात प्रमुख निर्देशांकात घसरण झाली. बँकिंग, वित्त आणि वाहन निर्मिती कंपन्यांच्या समभागात चौफेर विक्रीच्या माऱ्याने सेन्सेक्स-निफ्टीत जवळपास १ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हचा तूर्त जैसे थे पवित्रा असला तरी महागाईशी लढा देण्यासाठी तिने व्याजदर वाढीची शक्यता वर्तविल्याने जगभरातील भांडवली बाजारांमध्ये घसरण झाली.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५७०.६० अंशांनी घसरून ६६,२३०.२४ पातळीवर बंद झाला. दिवसभरात ६७२.१३ अंश गमावत त्याने ६६,१२८.७१ ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १५९.०५ अंशांची घसरण झाली आणि तो १९,७४२.३५ पातळीवर स्थिरावला.
हेही वाचा >>>व्याजदर वाढीच्या भीतीने ‘सेन्सेक्स’मध्ये आठ शतकी घसरण, गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; निफ्टी २० हजारांखाली
फेडरल रिझर्व्हच्या कठोर भूमिकेमुळे आणि दीर्घ काळापर्यंत उच्च-व्याजदराची स्थिती कायम राहणार असल्याचे संकेत आहेत. जे मंदीकडे झुकत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेसाठी निश्चितच मानवणार नाही. याचबरोबर जागतिक पातळीवरील खनिज तेलाच्या उच्च किमती आणि देशात हंगामी पावसाच्या लहरीपणामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबिला आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.बाजारातील विक्रीचा फटका हा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बसला. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिड कॅप आणि स्मॉल कॅप क्षेत्रातील कंपन्यांच्या क्षेत्रातही नफावसुली झाली.
सेन्सेक्समध्ये आयसीआयसीआय बँकेचा समभाग २.८१ टक्क्यांनी घसरला, त्यापाठोपाठ महिंद्र अँड महिंद्र, स्टेट बँक, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, कोटक महिंद्र बँक, टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक आणि पॉवर ग्रिड यांच्या समभागात सर्वाधिक पडझड झाली. तर टेक महिंद्र, भारती एअरटेल, इन्फोसिस, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, लार्सन अँड टुब्रो आणि टायटन यांचे समभाग तेजीत होते.
हेही वाचा >>>रोखे म्युच्युअल फंडांना ऑगस्टमध्ये २५,८७२ कोटींची गळती
विक्रमी तेजीनंतर, तीव्र उताराची मालिका
भांडवली बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने सलग ११ दिवसांच्या तेजीची २००७ नंतरची सर्वात मोठी मालिका अनुभवली आणि त्यायोगे ४.६३ टक्क्यांची कमाई केली. पण त्यानंतरच्या सलग तीन सत्रात तितक्याच तीव्र स्वरूपाची घसरगुंडीही अनुभवास येत आहे. केवळ तीन दिवसांत निर्देशांकाने १,६०८ अंश गमावले आहेत. सोमवारी सेन्सेक्स २४२ अंशांनी, बुधवारी ७९६ अंशांनी आणि गुरुवारी ५७० अंशांची घसरण सेन्सेक्सने अनुभवली आहे. गणेश चतुर्थीनिमित्त मंगळवारी बाजारातील व्यवहार बंद होते. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे अंदाजे ५.५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांचे बाजार भांडवलही ३१८ लाख कोटी रुपयांवर घसरले आहे.