Stock Market Today Updates: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात करवाढीच्या निर्णयामुळे जागतिक शेअर बाजारात मोठी अस्थितराता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशात आज मंगळवार, १५ एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. सकाळी ९:३० वाजता, बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स १,५६९.९० अंकांनी किंवा २.०९ टक्क्यांनी वाढून ७६,७२७.१६ वर पोहोचला आहे. तर, एनएसई निफ्टी निर्देशांक ४७३ अंकांनी किंवा २.०७ टक्क्यांनी वाढून २३,३०१.५५ वर पोहोचला आहे.
सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी, टाटा मोटर्सचा शेअर सर्वाधिक ४.०८ टक्क्यांनी वाढून ६१९.३५ वर व्यवहार करत आहे. त्यानंतर एचडीएफसी बँक २.९३ टक्क्यांनी वाढून १,८५९.६० वर व्यवहार करत आहे. तर, भारती एअरटेल २.५४ टक्क्यांनी वाढून १,८०१.९५ वर व्यवहार करत आहे. दरम्यान आज शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स निर्देशांकातील सर्वच कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.
दरम्यान तीन दिवसांच्या सुट्यांनंतर भारतीय निर्देशांक सकारात्मक उघडले असून, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकन शेअर बाजारात तंत्रज्ञान क्षेत्रात आलेल्या तेजीमुळे आज सकाळी आशियाई बाजारही तेजीत उघडले. जपान आणि ऑस्ट्रेलियन शेअर बाजार सकारात्मक स्थितीत उघडले. तर, दक्षिण कोरियाचे मुख्य निर्देशांक देखील वधारले आहेत. जागतिक बाजारपेठेत उत्साह दिसून येत असल्याने, आता सर्वांचे लक्ष भारतीय बाजारांवर आहे.
अमेरिकन बाजार सकारात्मक
सोमवारी अमेरिकेतील तिन्ही प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाल्याने आठवड्याची सुरुवात सकारात्मक झाली. डाऊ जोन्स ३०० अंकांपेक्षा जास्त वधारला, तर एस अँड पी ५०० आणि नॅस्डॅकमध्ये देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
आज जाहीर होणार महागाई आकडेवारी
भारतीय शेअर बाजार आज तेजीत उघडले असले तरी, सर्वांचे लक्ष आता मार्च महिन्यातील भारताच्या महागाई आकडेवारीकडे लागले आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आणि घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) दोन्हींची आकडेवारी आज (१५ एप्रिल रोजी) जाहीर होणार आहे.
अनेक कंपन्यांच्या तिमाही उत्पन्नाची आज घोषणा
याचबरोबर आज (१५ एप्रिल रोजी) अनेक कंपन्या त्यांच्या तिमाही उत्पन्नाची घोषणा करणार आहेत. यामध्ये आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स आणि इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (इरेडा) यांच्या तिमाही उत्पन्नाकडे सर्वांच्या नजरा आहेत. यामधील इतर कंपन्यांमध्ये जीएम ब्रुअरीज, बॉम्बे वायर रोप्स, डेल्टा इंडस्ट्रियल रिसोर्सेस, हॅथवे भवानी केबलटेल अँड डेटाकॉम, एमआरपी अॅग्रो आणि स्वस्तिक सेफ डिपॉझिट अँड इन्व्हेस्टमेंट्स यांचा समावेश आहे.