मुंबईः देशा-विदेशातील घडामोडी आणि चांगल्या-वाईट बातम्यांचा ओघ सुरू राहिल्याने शुक्रवारी (२४ जानेवारी) सप्ताहसांगतेला शेअर बाजारात नरम-गरम वातावरण राहिले. घसरणीने सुरुवात आणि मध्यान्हाला सेन्सेक्सची ४०० अंशांची उसळी तर तासाभरात कमावलेले सर्व गमावून अखेरीस उतरंड अशा चढ-उतारांची बाजारावर छाया राहिली.
दिवसाची अखेर मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ३२९.९२ अंशाच्या नुकसानीने ७६,१९०.४६ पातळीवर केली. तर एनएसई निफ्टी निर्देशांक ११५.८५ अंश तोट्यानिशी २३,०८९.५० वर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीने प्रत्येकी अर्धा टक्का तोटा नोंदविला.
आयटी शेअर्समध्ये सलग तिसऱ्या सत्रात, तर ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील शेअर्समधील सलग दुसऱ्या सत्रात राहिलेली तेजी सेन्सेक्स-निफ्टीसाठी आधार देणारी ठरली. फार्मा, बँकिंग आणि ऑटो शेअर्समधील कमकुवत प्रवाह निर्देशांकांना खाली खेचणारा ठरला. गुरुवारच्या विपरित, खरेदीचे पाठबळ केवळ आघाडीच्या लार्ज कॅप शेअर्समध्ये दिसून आले. व्यापक बाजारात मधल्या व तळच्या श्रेणीतील शेअर्सना नफावसुलीसाठी झालेल्या विक्रीचा जबर फटका बसला. परिणामी बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकात दोन टक्क्यांहून मोठी घसरण दिसून आली. गुरुवारी हेच शेअर्स उसळले होते, पण शुक्रवारी त्या तुलनेत मोठ्या घसरणीचा घाव त्यांना बसला.
देशांतर्गत अर्थस्थितीः
देशाच्या खासगी क्षेत्राची सक्रियता ही १४ महिन्यांच्या नीचांकापर्यंत घटल्याचे दर्शविणारी आकडेवारी शुक्रवारी आली. भारताच्या उत्पादन आणि सेवा क्षेत्रांच्या एकत्रित सक्रियततेत महिनागणिक बदल मोजणारा एचएसबीसी इंडिया कम्पोझिट आउटपुट निर्देशांक डिसेंबरमध्ये ५९.२ गुणांच्या पातळीवरून जानेवारीमध्ये ५७.९ गुणांपर्यंत घसरला. अर्थसंकल्प तोंडावर आला असताना आलेला हा आकडा १४ महिन्यांतील सर्वात कमकुवत विस्ताराचा दर दर्शवतो. तथापि, केवळ उत्पादन क्षेत्राची कामगिरी दर्शविणारा पीएमआय निर्देशांक डिसेंबरमधील ५६.४ गुणांवरून, जानेवारीत ५८.० गुणांपर्यंत विस्तारल्याचे या सर्वेक्षणाने स्पष्ट केले.
ही या आकडेवारीतील दिलासादायी बाब असली तरी कम्पोझिट निर्देशांकातील घसरण ही सेवा क्षेत्राच्या कामगिरीतील उतरंडीमुळे असल्याचेही त्यातून सूचित होते. सेवा क्षेत्र हे आजवर देशातील रोजगारनिर्मिती, नवीन कार्यादेश व उत्पादनांतील आघाडीचे क्षेत्र राहिले आहे, तेच आता अर्थव्यवस्थेतील कमजोर साखळी असणे हे चिंताजनक असल्याचे एचएसबीसीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाल्या.
जागतिक घडामोडींचे प्रतिबिंबः
जागतिक आघाडीवर, बँक ऑफ जपानने शुक्रवारी व्याजदर २५ आधार बिंदूंनी (पाव टक्के) वाढवून ०.५ टक्के पातळीवर नेले. ज्यामुळे तेथील व्याजाचे दर हे २००८ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. पतविषयक धोरणांतील दीर्घकाळ सुरू राहिलेला नरमाईचा कल तेथील मध्यवर्ती बँक आता बदलण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, अमेरिकी बाजारात मुख्य निर्देशांक एस अँड पी ५०० गुरुवारी विक्रमी उच्चांकांवर बंद झाला. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्याजदर कमी करण्याचे आणि तेलाच्या किमती स्वस्त करण्याचे सूचक विधान केल्यानंतर डाऊ जोन्स आणि नॅसडॅक हे इतर दोन निर्देशांकही सलग चौथ्या दिवशी वधारले. विक्रमी उच्चांक गाठणारे अमेरिकी बाजार आणि १० वर्षांच्या अमेरिकी रोख्यांच्या परतावा दरातही वाढ सुरू राहिल्याचा विपरित ताण भारतीय बाजारांवर स्वाभाविकच राहील. परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) यातून विक्री करत राहतील आणि बँकिंगसारख्या लार्ज कॅप शेअर्सवर त्यामुळे दबाव दिसून येईल, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार व्ही के विजयकुमार म्हणाले.
उत्साहवर्धक काय?
निफ्टी एफएमसीजी निर्देशांक ०.५२% वाढून ५६,०६९ वर पोहोचला. दुसरीकडे निफ्टी आयटी Nifty IT निर्देशांकांचीही आगेकूच सुरू असून तो ०.४० टक्के वाढीसह ४३,५२४ वर पोहोचला. सलग सत्रांमध्ये हे निर्देशांक वाढत आले आहेत.
निराशादायी काय?
बँक निफ्टी Nifty Bank निर्देशांक ०.४६% घसरणीसह ४८,३६७ वर रोडावला. बीएसई स्मॉल कॅप BSE SmallCap निर्देशांक तर २.२३% आणि बीएसई मिडकॅप BSE MidCap निर्देशांक १.६०% असे मोठ्या फरकाने आपटले. त्यामुळे बाजारात घसरणाऱ्या शेअर्सची संख्या २,५९६ तर त्या तुलनेत वाढणाऱ्या शेअर्सची संख्या अवघी ९०० इतकी कमी राहिली.